ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– मागील अनेक वर्षापासून येथील बंद पडलेली विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होत आहे. दि. २३ मार्चपासून नांदेड ते पुणे या विमानाने ही विमानसेवा सुरू होणार आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, शनिवार आणि रविवारी या दिवशी नांदेड पुणे विमानसेवा असणार आहे.
मागील तीन वर्षापासून नांदेडची विमानसेवा बंद होती. त्यामुळे नांदेडकरांसह देश- विदेशातील शीख भाविकांना दर्शनासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच मुंबई, पुणे, हैदराबाद अशी कोणतीच सेवा नसल्याने सर्वांनाच मोठा त्रास होत आहे. सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने विमान प्राधिकरण व केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा आणि पत्रव्यवहार करण्यात येत होते. गुरुद्वाराला येणाऱ्या भाविकांची मुख्य मागणी लक्षात घेता बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीरसिंग यांनी स्वतः यात लक्ष घालून केंद्रीय उड्डयन मंत्री आणि संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली. यात केंद्र सरकारने मार्चमध्ये श्री हुजूर साहेब नांदेडसाठी विमानसेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. आता अखेर ही सेवा 23 मार्चपासून ही विमानसेवा सुरू होत आहे.
स्टार एअरलाईन्स कंपनीचे नांदेड- पुणे हे विमान सायंकाळी चार वाजून 40 मिनिटाला नांदेड विमानतळावरून उड्डाण करत पुणे विमानतळावर पाच वाजून तीस मिनिटाला पोहोचणार आहे. 175 आसन क्षमता असलेले हे विमान सोमवार, मंगळवार, बुधवार, शनिवार आणि रविवारी असे आठवड्यातील पाच दिवस धावणार आहे. तसेच पुणे येथून नांदेडसाठी सायंकाळी ०६ वाजता उड्डाण करत ०६ वाजून ५० मिनिटाला येथील श्री गुरु गोविंदसिंग विमानतळावर येणार आहे.
या विमानसेवेमुळे नांदेड- पुणे कनेक्टिव्हिटी चांगली झाल्याने आता नांदेडकरांना व परिसरातील प्रवाशांना रेल्वे किंवा खासगी वाहनावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. तब्बल तीन वर्षानंतर सुरू होणाऱ्या विमानसेवेमुळे नांदेडकरांमधून या निर्णयाचे स्वागत होत आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
