ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांचीही होती उपस्थिती
लातूर (शशिकांत पाटील) : आज सकाळी ११ वा. देशभरात राष्ट्रगीताचं समूह गाण होणार होते. ज्याचे पालन शाळा-महाविद्यालय, शासकीय-निमशासकीय, खाजगी कार्यालये, व्यापारी-प्रतिष्ठान ठिकाणी अशा सर्वांनीच केले. मात्र चक्क स्मशानभूमीतही चितेला अग्नि देण्यापूर्वी सुध्दा राष्ट्रगीत गायिल्यानंतरचअंत्यसंस्काराचे पुढील विधी केले गेल्याचे अनोखी घटना घडली. ही घटना आहे लातूर जिल्ह्यातील औसा येथील.
https://fb.watch/eZ1tgJPEfO/
सोलापूर येथील गुरुभक्त असलेले रत्नाकर रंगनाथ वाघमारे यांचे १६ ऑगस्ट रोजी औसा येथील श्रीनाथ मंदीरात चक्रीभजन सुरू असतांना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. गुरुदरबारी मृत्यू झाल्यामुळे गुरुदरबारीच त्यांच्या अंत्यविधी व्हावी अशी इच्छा त्यांच्या मुलीने व नातेवाईकानी व्यक्त केली. गहिनीनाथ महाराज व गुरुबाबा महाराज यांनी, शहरातील भावसार समाज व आर्य सोमवंशी समाजातील काही प्रमुख सदस्यांना बोलवून अंत्यविधी करण्याबाबत चर्चा केली.
महाराजांच्या सूचनेनुसार त्यांचा अंत्यविधी आज १७ ऑगस्ट रोजी सकाळी औसा येथील क्षत्रिय भावसार समाज समशानभूमीत करण्याचे ठरले. त्यानुसार रत्नाकर रंगनाथ वाघमारे यांचे पार्थिव आज १७ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वा. स्मशानभूमीत आणण्यात आले. पण अंत्यविधीची तयारी पूर्ण होईपर्यंत ११ वाजले. त्यामुळे अगोदर समूह ‘राष्ट्रगीत’ गाऊनच वडिलांच्या चितेला अग्नी देण्याचे त्यांच्या मुलीने आणि नातेवाईकांनी ठरवले. आणि उपस्थितांनी ‘राष्ट्रगीत’ गाऊनच नंतर रत्नाकर रंगनाथ वाघमारे यांचा अंत्यविधी केला. या प्रसंगी पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज, भाजपचे स्थानिक युवा नेते समीर डेंग, वाघमारे कुटुंबिय, त्यांचे नातेवाईक, भावसार समाज-आर्य सोमवंशी समाजातील अनेकांची उपस्थिती होती.
राष्ट्र प्रथम मानून चक्क स्मशानभूमीतही देशाभिमान बाळगणाऱ्या वाघमारे कुटुंबियांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. त्यामुळे अनोखी राष्ट्रभक्ती बाळगणाऱ्या सोलापूर येथील वाघमारे कुटुंबिय तसेच इथे उपस्थित असणाऱ्या सर्वांच्याच देशाभिमानाची मोठी चर्चा होऊ लागली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻