ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– नालीत कचरा का टाकला या कारणावरून भावकीतील दोघांचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना शहराच्या देगावचाळ भागात काल 1 मार्चच्या रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास घडली आहे. यात इतर दोघे जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शहराच्या देगावचाळ भागातील दिगंबर वामनराव राजपूत (वय 66) हे भाजीपाला विक्रेते आपल्या कुटुंबीयांसह राहतात. त्यांच्या शेजारीच त्यांच्या भावकीतील दिगंबर राजभोज कुटुंबीय राहतं. काल रात्री कचरा टाकलीच्या क्षुल्लक कारणावरून या दोन कुटुंबियांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले आणि यातच काहीजणांनी राजभोज कुटुंबातील प्रफुल्ल दिगंबर राजभोज (वय 35) आणि संतोष दिगंबर राजभोज (वय 33) यांना चाकूने पोटात, बरगडीत भोसकून त्यांचा खून केला. यात संदीप दिगंबर राजभोज (वय 27) आणि राहुल संजय धोंगडे (वय 18) या दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. संदीप राजभोज आणि राहुल धोंगडे यांच्यावर विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिगंबर वामनराव राजभोज यांच्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना रात्रीच ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) चंद्रसेन देशमुख, पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराज जमदडे यांनी भेट दिली असून आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी शोध पथके नियुक्त केले आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
