Wednesday, July 24, 2024

जय श्रीराम, सियावर रामचंद्र की जय, जयघोषाने शहर दणाणले…

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ शांततेत, उत्साहाच्या वातावरणात श्रीराम नवमी साजरी


◆ मिरवणुकीतील विविध देखाव्यांनी नांदेडकरांचे लक्ष वेधले

नांदेड (प्रल्हाद कांबळे)- कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनी श्रीराम नवमी मिरवणूकीला शासनाने परवानगी दिल्याने राम भक्तांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पसरले होते. आज रविवार दि. १० एप्रिल रोजी सकाळपासूनच राम भक्तांनी रामनवमीची जय्यत तयारी केली होती. सकाळी शहरातून भव्य दुचाकी रॅली, प्रचंड घोषणा आणि शहराच्या मुख्य रस्त्यावर रामनवमीनिमित्त श्रीराम प्रभू यांचे होर्डिंग्ज यामुळे शहरात आज भक्तिमय वातावरण दिसून आले. चोख पोलीस बंदोबस्तात नांदेड शहरात शांततेत श्रीरामनवमी मिरवणूका निघाल्या.

रामनवमीनिमित्त शहरभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी डॉ. विपीन, पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिध्देश्वर मोरे, चंद्रसेन देशमुख यांनी आजच्या रामनवमीनिमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांततेत हा उत्सव पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. रामनवमीत उत्साह कायम रहावा यासाठी रामभक्त व पोलीस, महसूल आणि महापालिका प्रशासनाने मेहनत घेतली.

जुन्या नांदेड भागात होळी येथे असलेल्या पुरातन राम मंदिरात सकाळपासूनच गर्दी होती. अशीच काहीशी गर्दी जुना मोंढा भागातील राम मंदिरात होती. यशवंतनगर भागातील श्री राम मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच श्रीरामाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. दुपारी 12 वाजता रामजन्म समय होताच आरती झाली आणि भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आला.

शहरातील रेणुका माता मंदिरासमोर सकाळपासूनच रामजन्म मिरवणुकीची तयारी सुरू होती. त्यात अनेक भजन मंडळी होते. दुपारी चार वाजता ही मिरवणुक रेणुका माता मंदिर येथून सुरू झाली आणि हळूहळू मार्गक्रमण करत वजिराबाद भागात पोहचली. मिरवणुकीत शहीद बलिदान दिन, इस्कॉन भजन मंडळ, राम रथ, मंगल पांडे झाकी, राम सीता रथ, सुंदर व देखणी राममूर्ती, हनुमानाची वानरसेना, श्री बसवेश्वर महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरुगोविंद सिंग महाराज यांच्या प्रतिमा मिरवणुकीत सहभागी असलेल्या ट्रकवरती लावण्यात आल्या होत्या. या मिरवणुकीचा शेवट अशोकनगर भागातील हनुमान मंदिर येथे रात्री उशिरा झाला.

मिरवणूकीत आयोजकांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांना बिनतारी संदेश यंत्र दिलेले होते. मिरवणूकीच्या सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत या बिनतारी संदेश यंत्राद्वारे आयोजक मिरवणूकीचे सर्व नियोजन करत होते.

प्रभु श्री रामचंद्राच्या या जन्मोत्सव मिरवणूकीत आयोजकांनी भारत माता, भारतीय स्वातंत्र्यात आपले जीव बलिदान देवून आम्हाला स्वातंत्र्य दाखविणाऱ्या अनेकांचे छायाचित्र, गुरू गोविंदसिंघजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भगवान झुलेलाल, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, बसवेश्वर महाराज यांचे छायाचित्र मिरवणूकीत लावून सर्व धर्म समभाव जपला. सोबतच प्रभु श्रीराम, माता सिता, आणि बंधू लक्ष्मण यांच्यासह हनुमान आणि हनुमानांचे अनेक सेवक असा देखावा केला होता. स्वतंत्रता सेनानी आणि इंग्रजांमधील चकमकीचा देखावाही या मिरवणूकीत होता.

शहरभर अनेक जागोजागी भाविकांनी मिरवणुकीतील लोकांसाठी भोजन, थंड पाणी, सरबत आदी सोय केली होती. मागील दोन वर्षांपासून बंद असलेली रामनवमी मिरवणुक यंदा जोरदारपणे साजरी झाली. मिरवणुकीत असंख्य रामभक्त युवक सहभागी झाले होते. मिरवणूकीत महिला, युवती, वृध्द मंडळी सर्वांनीच या दोन वर्षापासून बंदी असलेल्या मिरवणूकीत सहभागी होवून आनंद घेतला. रामभजन, देशभक्ती गिते गात भजनीमंडळींनी भक्तांचा उत्साह वाढवला. अत्यंत उत्साहात रामजन्म साजरा करत आला. जय श्री रामच्या घोषणांनी शहर दणाणून गेले.

मिरवणुकीदरम्यान पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख, डॉ. सिद्धेश्वर भोरे, सचिन सांगळे, विक्रांत गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, भगवान धबडगे, डॉ. नितीन काशीकर, अनिरुद्ध काकडे, अशोक घोरबांड, जगदीश भंडरवार, सुधाकर आडे, गजानन सैदाने, अनंत नरुटे, संजय ननवरे यांच्यासह आदी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी मिरवणुकीदरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेतली. रखरखत्या उन्हात राम भक्तांना विश्वासात घेत पोलिसांनी श्रीरामनवमी निर्विघ्न पार पाडली. जिल्हा पोलीस दलाच्या वतीने श्रीराम नवमी संयोजन समिती, नांदेडकर व रामभक्तांचे आभार मानले.

मिरवणुकीत खासदार प्रताप पाटील चिखलीकर, डी. पी. सावंत, आ. अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहनराव हंबर्डे, मनपाचे विरोधी पक्ष नेता दीपकसिंह रावत, महापौर जयश्री पावडे, स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, महापालिका आयुक्त सुनील लहाने, जिल्हाधिकारी डॉ. विपीन, भाजपाचे प्रवीण साले, चैतन्यबापू देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे, आनंद बोंढारकर, विश्व हिंदू परिषदेचे शशिकांत पाटील, महेश देबडवार, धनंजय वाघमारे यांच्यासह अन्य सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!