Friday, July 19, 2024

तिकडे मंत्रिमंडळ विस्ताराची धामधूम आणि खुद्द मुख्यमंत्री इकडे नांदेडमध्ये! तीन वेळा बदललेल्या दौऱ्यानंतरही एकनाथ शिंदे आल्याने नेते- कार्यकर्त्यांनी सोडला सुटकेचा निःश्वास

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ भाजपनेही केले जल्लोषात स्वागत

नांदेड- तिकडे मुंबईत मंत्रिमंडळ विस्ताराची मोठी धामधूम सुरू असताना खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र आज नांदेडमध्ये येऊन धडकले. तीन वेळा बदललेल्या दौऱ्यानंतरही शब्द पाळत अखेर मुख्यमंत्री नांदेडमध्ये आल्याने नेते आणि कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नांदेड दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. खासदार हेमंत पाटील यांच्यासह आमदार बालाजी कल्याणकर आणि इतर नेते कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नांदेड दौऱ्यासाठी जय्यत तयारी केली होती. शिवसेनेतून शिंदे गटात आलेले इतर अनेक प्रमुख पदाधिकारीही या दौऱ्यासाठी आणि स्वागतासाठीच्या तयारीत झटत होते. आधी दोन दिवसीय मुक्कामी दौऱ्यावर मुख्यमंत्री येणार होते. मात्र त्यानंतर त्यांच्या दौऱ्यात तब्बल तीन वेळा बदल झाला आणि त्यामुळेच त्यांच्या दौऱ्याविषयी साशंकता निर्माण झाली होती. त्यातच आज अनेक दिवसांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर मुंबईत जोरदार हालचाली आणि तयारी सुरू झाल्याने तर मुख्यमंत्र्यांचा नांदेड दौरा रद्दच होणार अशी दाट शक्यता निर्माण झाली होती. पण तरीही सायंकाळी नांदेडमध्ये येत मुख्यमंत्र्यांनी आपला हा नियोजित दौरा पूर्ण केला.

मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात शिवसेनेत मोठी फूट पडल्यामुळे तर हा दौरा अधिकच लक्षवेधी ठरला होता. शिवसेनेच्या दोन जिल्हाप्रमुखांसह अनेक तालुकाप्रमुख आणि अनेक शहर प्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश केला. या सर्व फाटाफुटीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा दौरा तब्बल तीन वेळा बदलला होता. त्यामुळे ते नांदेडमध्ये येतात की नाही अशी धाकधूक प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही लागली होती.

मात्र अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड नांदेड दौऱ्याचा दिलेला आपला शब्द पाळला आणि ते सायंकाळी नांदेडमध्ये डेरेदाखल झाले. तिकडे मुंबईमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची मोठी धामधूम असतानाही मुख्यमंत्र्यांनी आपला दिलेला शब्द पाळण्यासाठी नांदेड दौरा केल्याने प्रमुख नेत्यांसह कार्यकर्ते चांगलेच सुखावलेले आहेत. परिणामस्वरूप विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे अत्यंत जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर येथील भक्ती लॉन्स येथे झालेल्या मेळाव्यासही नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठी उपस्थिती लावल्याचे पहावयास मिळाले.

नांदेडला जोडूनच मुख्यमंत्र्यांच्या हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र नांदेड प्रमाणेच हिंगोली जिल्ह्याचा दौराही रद्द होतो की नाही अशी साशंकता निर्माण झाली होती, मात्र मुख्यमंत्र्यांनी नांदेडबरोबरच हिंगोली जिल्ह्याचाही आपला नियोजित दौरा पूर्ण केला. नांदेडहून ते हिंगोली जिल्ह्याकडे रवाना झाले.

भाजपनेही केले जल्लोषात स्वागत
भाजपनेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जल्लोषात स्वागत केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, भाजपचे महानगर अध्यक्ष प्रवीण साले, भाजपचे युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर, चैतन्यबापू देशमुख यांच्यासह अनेक भाजप नेते- कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या मंचावर उपस्थिती दर्शवत मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर स्वागत
तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज येथील श्री गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर आगमन झाले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी त्यांचे स्वागत केले. याचबरोबर खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार मोहनराव हंबर्डे, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने आदी मान्यवर उपस्थित होते. 

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!