ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– राज्यात अनेक ठिकाणी शनिवारी (दि. दोन) सायंकाळी सहाच्या सुमारास आकाशात प्रकाशरेषा दिसून आल्या. दरम्यान, याचे छायाचित्र सोशल मीडियात व्हायरल झाले. शिवाय उल्कापात झाल्याची चर्चा सोशल मीडियात रंगली. पण, हा उल्कापात नसून इलेक्ट्रॉन रॉकेट बूस्टरचे तुकडे असल्याचे औरंगाबाद येथील एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.
औंधकर म्हणाले, ‘‘न्यूझीलंड येथील माहिया द्वीपकल्पावरून भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६:११ वाजता तेथील रॉकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन रॉकेटद्वारे ब्लॅकस्काय नावाचा उपग्रह पृथ्वीच्या ४३० किमी उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला. शनिवारच्या तारखेत केवळ एकाच रॉकेट उड्डाणाची नोंद असल्याने शनिवारी सायंकाळी उत्तर-पूर्व महाराष्ट्रात दिसलेली घटना ही या इलेक्ट्रॉन रॉकेटच्या बूस्टरचेच तुकडे असावेत. आपल्या भागात साधारण तीस ते पस्तीस किमी उंचीवरून बूस्टर वातावरणाशी घर्षण झाल्याने एकामागोमाग एक असे ते जळत गेले. दिसणाऱ्या घटनेचा मार्ग व प्रकाशमान याचा अंदाज घेतला तर ही कोणतीही उल्का वर्षाव किंवा उडती तबकडी सारखी घटना नाही हे निश्चित आहे’’, असा दावाही त्यांनी केला.
अनेकांनी कॅमेऱ्यात टिपले चित्र
नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आकाशात प्रकाशरेषा दिसून आल्या. त्यामुळे अनेकांनी याबाबत तर्कवितर्क लावले. दरम्यान नांदेडसह जिल्ह्यातील आदी ठिकठिकाणी परिसरातही हे चित्र दिसून आले. बहुतांश गावात ग्रामस्थ, युवकांनी आकाशातील हे दृश्य मोबाईलफोनच्या कॅमेऱ्यातही टिपून घेतले. रात्रभर याबाबत जोरदार चर्चा सुरू होत्या.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻