Saturday, July 27, 2024

दंगल प्रकरण: नांदेडच्या तत्कालीन आमदारांसह शिवसेनेच्या १९ नेते-कार्यकर्त्यांना ५ वर्षांची शिक्षा; प्रत्येकी १ लाख ६० हजारांचा दंडही

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

माजी आमदार अनुसयाताई खेडकर, जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, भुजंग पाटील, महेश खेडकर, ॲड. दिलीप ठाकूर, मनोज यादव आदी १९ जणांना शिक्षा

नांदेड- २००८ साली झालेल्या दंगलीप्रकरणी शिवसेनेच्या माजी आमदार, जिल्हाप्रमुख, सहसंपर्कप्रमुखांसह १९ जणांना नांदेड जिल्हा न्यायालयाने पाच वर्षाची शिक्षा ठोठावली आहे.

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माजी आमदार अनुसयाताई खेडकर, शिवसेना आताचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, सहसंपर्कप्रमुख भुजंग पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरहरी वाघ यांच्यासह १९ जणांना आज मंगळवार दिनांक ११ एप्रिल रोजी जिल्हा न्यायाधीश (पहिले) शशिकांत बांगर यांनी पाच वर्षे सक्त्तमजुरी आणि प्रत्येकी एक लाख ६० हजार ७५० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. यावेळी जिल्हा न्यायालयात शिवसेना पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. हा निकाल पंधरा वर्षानंतर लागला.

शिवसेनेच्या तत्कालीन आमदार अनुसयाताई खेडकर यांनी पक्षाच्या आदेशावरून महागाई विरोधात रास्ता रोको आंदोलन केले होते. मात्र या आंदोलनाला हिंगोली गेट उड्डाणपुलाखाली सात जून २००८ रोजी हिंसक वळण लागले. यावेळी पोलीस अधीक्षक रविंद्रकुमार सिंगल, उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर) डॉ. मनोजकुमार शर्मा आणि वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश सोनवणे यांनीही घटनास्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले होते.

आंदोलनकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या (एम एच २० डी ५९ १७), (एम‌एच २० डी ७३४८), (एमएच २० डी ६८१२), ( एम‌एच४० – ९६२३), एमएच ४० – ८१२५), (एम एच २० डी ५१७३) आणि महानगरपालिकेची (एमएच २६ एल २७३) या गाड्यांची तोडफोड केली होती. यावेळी काही पोलीस कर्मचारीही दगडफेकीत जखमी झाले होते. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन वजिराबाद पोलीस ठाण्यात हजर केले होते. एसटी बस चालक हावगीरवार पिंपराळे यांच्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १४०/ २००८ कलम 353, 332, 341, 147, 148, 143, 149, 427 आणि 336 सह सार्वजनिक मालमत्ता नुकसान कलम तीनप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही आरोपींना अटक करून त्यांची जामिनावर सुटका झाली होती.

या प्रकरणी पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. हे प्रकरण सुरू असतानाच चार वर्षांपूर्वी जिल्हा न्यायालयात वर्ग करण्यात आले. जिल्हा न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी या प्रकरणात उपलब्ध पुराव्या आधारे व साक्षीदारांचे जबाबावरून माजी आमदार अनुसयाताई खेडकर, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, सहसंपर्कप्रमुख भुजंग पाटील, माजी सभापती नरहरी वाघ, महेश खेडकर, ॲड. दिलीप ठाकूर, व्यंकोबा येडे, बाळगीर गिरी, श्रीकांत पाठक, संदीप छप्परवाल, सुभाष शिंदे, शिवाजी सूर्यवंशी, बाळू तिडके, दौलत पोकळे, नवनाथ भारती, भुजंग कावळे, बालाजी शिंदे, भाया शर्मा, आणि मनोज यादव या १९ जणांना विविध कलमान्वये पाच वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी एक लाख ६० हजार ७५० रुपये रोख दंडाची शिक्षा सुनावली.

यावेळी पोलिसांनी न्यायालय परिसरात चोख बंदोबस्त लावला होता. शिक्षा होताच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंद बोंढारकर, शहरप्रमुख तुलजेश यादव, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब देशमुख, जिल्हाप्रमुख बबन बारसे, रमेश पाटील कोकाटे, सुनील कदम मरळककर यांच्यासह अनेक शिवसैनिक, पदाधिकारी न्यायालयात उपस्थित होते. पैरवी अधिकारी म्हणून वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जितेंद्र तरटे, दैवशाला नागरवाड आणि वैशाली कुलथे यांनी काम पाहिले तर सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती कोकाटे यांनी युक्तिवाद केला.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!