ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

किनवट (जि. नांदेड)- सलूनमध्ये दाढीचे पैसे देण्याच्या कारणावरुन दुकानदाराने ग्राहकाची धारदार शस्त्राने हत्या केली. त्यानंतर याप्रकाराचा वचपा काढण्यासाठी अज्ञात जमावाने सलून दुकानदाराची ठेचून हत्या केली. या दुहेरी खुनाची खळबळजनक घटना तालुक्यातील बोधडी (बु.) येथे गुरुवारी दि.१४ सायंकाळी घडली. हत्याकांडाच्या घटनेनंतर सलून दुकान, २ घरांची जाळपोळ झाल्याची माहिती असून, तणावाच्या पार्श्वभूमीवर बोधडीला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे.
बोधडी (बु.) येथील अनिल मारुती शिंदे ( वय ४०) याचे बोधडी बाजारपेठेत सलूनचे दुकान आहे. गुरुवारी सायंकाळी त्याच्या दुकानात बोधडी येथीलच व्यंकटी सुरेश देवकर (वय २२) दाढी करण्यासाठी आला होता. दाढी करत असताना अर्धी झाल्यावर अनिल शिंदे याने व्यंकटी देवकरला दाढीचे पैसे देण्याची मागणी केली. याच कारणावरुन दोघांत वाद झाला.वादातच अनिल शिंदे याने व्यंकटी देवकर याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली.
ही घटना गावात पसरताच सलून दुकानाजवळ मोठा जमाव जमला. व्यंकटी याच्या खुनाचा वचपा काढण्यासाठी अज्ञात जमावाने अनिल शिंदे याला मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी होऊन मरण पावला. हत्याकांडानंतर दोन्ही बाजूच्या जमावाने जाळपोळ केली.यात २ ते ३ दुकाने व २ घरे जळाल्याचे सांगण्यात आले. अग्निशामक दलाचा बंब वेळेवर पोहोचल्याने अनर्थ टळला.
बोधडीतील दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे, पोलीस निरीक्षक अभिमन्यू साळुंखे फौजफाट्यासह बोधडीला रवाना झाले. स्फोटक परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी किनवटसह मांडवी, सिंदखेड, इस्लापूर येथील पोलीस कुमकासह नांदेडचे जलद कृती दल व अन्य पथक तैनात झाल्याने बोधडी गावाला पोलीस छावणीचे स्वरुप आले. रात्री उशिरापर्यंत दुहेरी हत्याकांडप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
