Sunday, October 6, 2024

देगलूरमध्ये थरार: सशस्त्र दरोडेखोरांनी महिलेला ठार करून सुमारे चार लाखांचा ऐवज लुटला

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची घटनास्थळी भेट

देगलूर (जि. नांदेड)- दरोडेखोरांनी एका वृद्ध महिलेचा खून करून सुमारे चार लाखांचा ऐवज लुटल्याची थरारक घटना देगलूरमध्ये घडली आहे. देगलूर महाविद्यालयाच्या शेजारी असलेल्या लालबहादूर शास्त्री नगर मधील एका वृद्ध जोडप्याच्या घरात घुसून अज्ञात दरोडेखोरांनी आधी दोन्ही वृद्धांचे हातपाय बांधून जबरी चोरी करीत अंदाजे चार लाख रुपयांचा हा ऐवज लंपास केला. ही घटना 23 जानेवारीच्या रात्री साडेअकरा वाजता घडली. घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व सहाय्यक पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी घटनास्थळी भेट दिली.

तालुक्यातील येडूर येथील श्रीपतराव पाटील (90 ) व चंद्रकलाबाई (60) हे दोघे मागील काही वर्षापासून देगलूर- उदगीर या मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या  लालबहादुर शास्त्री नगर मध्ये एकत्र राहत होते. सोमवार दि. 23 जानेवारीच्या रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात तीन अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करुन एका चोराने श्रीपतराव पाटील यांच्या तोंडावर पाय देऊन त्यांचे हातपाय बांधून चाकूचा धाक दाखविला. बाकीच्या दोन चोरांनी  चंद्रकलाबाई आरडाओरड करू नये म्हणून त्यांचे तोंड व पाय कापडाने बांधले. त्यानंतर लुटालुट करीत कपाटात ठेवलेले 5 तोळे सोन्याचे कडे, 70 तोळे चांदीचे वाळे काढून घेतले. नंतर चंद्रकलाबाईच्या अंगावरील एका तोळ्याचे सोन्याचे मनी, दीड तोळ्याची बोरमाळ, 5 तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या असे एकूण साडेबारा तोळे सोन्याचे दागिने व 70 तोळ्याचे वाळे असा 3 लाख 89 हजार रुपयांचा ऐवज लुटला.

या घटनेची माहिती समजताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व सहाय्यक पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्यासह एलसीबीचे अधिकारी व कर्मचारी असा फौजफाटा, श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाला. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी घटनेची इत्यंभूत माहिती घेऊन तपासासंदर्भात सूचना दिल्या आहेत. घटनेलगत असलेल्या तरंग बारच्या सीसीटीव्ही कॅमे-याची पाहणी केली असता घटनेदरम्यान त्यामध्ये वीस ते पंचवीस वयोगटातील तीन तरुण मुख्य रस्त्यावरून जात असल्याचे दिसत आहेत.

तीन-चार वर्षांपूर्वी चंद्रकला बाईच्या संपत्तीवरून त्यांच्या कुटुंबात वाद निर्माण झाला होता अशी चर्चा आहे. खून झालेल्या चंद्रकला पाटील या फिर्यादी श्रीपतराव पाटील यांची तिसरी पत्नी असून त्यांच्या कुटुंबामध्ये प्रॉपर्टी वरून वाद सुरू असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे हा दरोडा आणि त्यातून झालेला खुनाचा प्रकार आहे, की इतर काही घातपाताचा प्रकार आहे, यादृष्टीनेही पोलीस तपास करीत आहेत. ही घटना चोरी प्रकारावरून झाली की संपत्तीच्या वादातून झाली याचा उलगडा आरोपीला पकडल्यानंतरच निष्पन्न होईल अशी माहिती पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी दिली.

याप्रकरणी श्रीपतराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तीन दरोडेखोरांविरुद्ध देगलूर पोलीस ठाण्यात कलम 397, 302, 34 भादंवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील वृद्ध महिलेचा गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज असून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल असे पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी सांगितले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!