Wednesday, July 24, 2024

धक्कादायक: डॉक्टरांना गोळ्या घालून ठार करणारा निघाला रुग्णाचा भाऊ; पोलिसांनी केली चार जणांना अटक

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

उमरखेड/ नांदेड– उमरखेड येथे वैद्यकीय सेवा बजावणारे नांदेडचे भूमिपुत्र डॉ. हनुमंत धर्मकरे यांना गोळ्या घालून ठार करणारा मारेकरी हा, मयत झालेल्या एका रुग्णाचा भाऊ असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

दिनांक ११ जानेवारी रोजी सांयकाळी पाचच्या दरम्यान उमरखेड येथील आर. पी. उत्तरवार कुटिर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत संताराम धर्मकारे यांची उमरखेड- पुसद रोडवर महाविद्यालयसमोर एका अज्ञात इसमाने गोळ्या झाडून हत्या केली. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधिक्षक, यवतमाळ यांनी पोलीस स्टेशन उमरेखड, बिटरगाव, पोफाळी, दराटी यांचे प्रत्येकी एक एक पथक, स्थागुशा येथील चार पथके व सायबर सेलचे दोन पथकं असे एकूण दहा पथके तयार केली होती. तसेच जिल्ह्यातील व जिल्हालगतच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या. स्थागुशा व सायबर सेल यांनी मृतक यांचा पुर्व इतिहास, कौटुंबिक कलह, आर्थिक वाद याची पडताळणी केली. घटनास्थळावरील तसेच उमरेखड शहरातून बाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज संकलित करण्याचे तसेच जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार यांना तपासण्याचे आदेश देण्यात आले.

संबंधित बातमी: नांदेडच्या डॉक्टरांचा उमरखेडमध्ये गोळ्या घालून खून*

वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत धर्माकरे यांच्या हत्येस कारणीभूत ठरू शकणारे भक्कम कारण शोधण्याकरीता प्रयत्न करण्यात आले. डॉ. हनुमंत धर्माकरे यांच्या वैद्यकीय सेवाकाळात घडलेल्या घटनांबाबतही सखोल माहिती प्राप्त करण्यात आली. त्यादरम्यान सन २०१९ मध्ये पोलीस स्टेशन उमरखेड अप क्रं. १९६/२०१९ कलम २७९. ३०४ (अ) भादवि मधील मृतक नामे शेख अरबाज शेख अब्रार याचा दिनांक ०४ मे २०१९ चे रात्री ०२ चे सुमारास शिवाजी चौक उमरखेड येथे मोटार सायकलचा अपघात झाला होता. त्या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने त्यास शासकीय रुग्णालय उमरखेड येथे उपचाराकरीता दाखल करण्यात आले होते. त्यादरम्यान या जखमीचा मृत्यू झाला. त्यावेळी आर. पी. उत्तरवार कुटिर रुग्णालय येथे डॉ. हनुमंत धर्माकरे हे कर्तव्यावर हजर होते. डॉ.हनुमंत धर्माकरे यांच्या हलगर्जीपणामुळेच अपघातातील जखमीचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यावेळी मृतकांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर केला होता. पोलिसांनी घटनेची शहानिशा करून वरीलप्रमाणे गुन्हा नोंद करुन प्रकरण हाताळले होते. जखमी होऊन नंतर मरण पावलेल्या मृतकाचा लहान भाऊ ऐफाज अब्रार शेख व त्याचे इतर नातेवाईक यांनी त्यावेळी डॉक्टरांसोबत हुज्जत घालून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती.

सदर प्रकरणातील तांत्रिक बाबींचे पोलिसांनी बारकाईने निरीक्षण केले. तेव्हा या घटनेतील प्राप्त संशयितांचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असलेला एक जण हा शेख ऐफाज शेख अन्नार याच्यासारखा चेहरेपट्टी व शरीरयष्टीचा दिसला. त्यावरून पोलिसांनी अधिक सखोल माहिती काढली असता आरोपी नामे ऐफाज ऊर्फ अप्पु शेख अब्रार वय २२ वर्ष याने त्याचे मामा सैय्यद तौसिफ सैय्यद खलील (वय ३५ रा. ढाणकी) व त्याच्या इतर मित्रांच्या मदतीने डॉक्टरांना गोळ्या घालून ठार करून ढाणकी येथे पसार झाल्याची गोपनीय माहिती मिळाली.

संबंधित बातमी : *डॉक्टर भावाचा गोळ्या घालून खून करण्यात आल्याच्या धक्क्याने दुसऱ्या डॉक्टर भावाला ‘हार्टअटॅक’; नांदेडमध्ये शस्त्रक्रिया*

सदर गोपनीय माहितीची व तांत्रिक बाबींची सांगड घालून गुन्हयातील आरोपी सैय्यद तौसिफ सैय्यद खलील (वय ३५ वर्ष), सैय्यद मुस्ताक सैय्यद खलील (वय ३२ वर्ष), शेख मोहसिन शेख कय्युम (वय ३४ वर्ष), शेख शहारुख शेख आलम (वय २७ वर्ष), सर्व रा. ढाणकी यांना शिताफीने ताब्यात घेउन त्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यामध्ये गुन्ह्यातील मुख्य आरोपी शेख ऐफाज शेख अनार (वय २२ वर्ष) याने डॉक्टर हनुमंत धर्माकरे यांचेवर पाळत ठेऊन, घटनेच्या दिवशी गोळ्या झाडून ठार केले व त्वरीत ढाणकी गाठले. गुन्हयात वापरलेली मोटर सायकल त्याने त्याचा ढाणकी येथील त्याचा मामा सैय्यद तौसिफ सैय्यद याच्या ताब्यात दिली व त्याच्या इतर साथीदाराच्या मदतीने ढाणकी येथून पसार झाला.

शेख ऐफाज शेख अनार याने आपला भाऊ शेख अरबाज ऊर्फ हड्डी शेख अब्रारच्या मृत्यूचा बदला म्हणून चक्क डॉक्टरांना गोळ्या झाडून ठार केल्याचा हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे.

सदर गुन्ह्यामध्ये (१) सैय्यद तौसिफ सैय्यद खलील वय ३५ वर्ष, (२) सैय्यद मुस्ताक सैय्यद खलील वय ३२ वर्ष, (३) शेख मौहसिन शेख कय्युम वय ३४ वर्ष, (४) शेख शहारुख शेख आलम वय २७ वर्ष सर्व रा. ढाणकी यांना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपीस पसार होण्यासाठी वापरण्यात आलेले वाहन क्रं. एम. एच. ०४ डी. एन. ६२६३ हस्तगत करण्यात आली आहे. मुख्य मारेकरी हा फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी दहा पथके वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत. सदरच्या गुन्ह्याचा उद्देश/हेतु याबाबत अधिक सखोल तपास करण्यात येत आहे. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये भादवि कलम १०९, १२० (ब), २१२ भारतीय हत्यार कायदा कलम ३. २७ तसेच अ.जा.ज.प्र.का. १९८९ चे कलम ३ (२) (व्ही) ची वाढ करण्यात आली आहे.

हा गुन्हा उघडकीस आणण्याकरीता पोलीस अधिक्षक, यवतमाळ डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधिक्षक के. ए. धरणे, उपविभागिय पोलीस अधिकारी, उमरखेड प्रदिप पाडवी, पोनि स्थागुशा प्रदिप परदेशी, ठाणेदार पोस्टे उमरखेड अमोल माळवे, ठाणेदार पोस्टे विटरगाव, पोस्टे दराटी, प्रभारी अधिकारी सायबर सेल अमोल पुरी यांच्या अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अहोरात्र परीश्रम घेतले.

अत्यंत गंभीर, संवेदनशील व आव्हानात्मक अशा या गुन्ह्याचा तपास व्यावसायिक कौशल्याचा व नैपुण्याचा पुरेपुर उपयोग करीत ४८ तासात उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधिक्षक, यवतमाळ यांनी तपास पथकातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना रुपये एक लाख रोख प्रोत्साहनपर बक्षीस, सीनोट जाहीर केले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!