ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड (प्रल्हाद कांबळे)- शहराच्या विष्णुपुरी येथील कै. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरामध्ये डुकरांच्या कळपाने रुग्णाचे लचके तोडल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. यात त्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज शनिवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. मयत हा नांदेड तालुक्यातील धनगरवाडी येथील रहिवासी होता.
नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालय मागील काही दिवसापूर्वी चर्चेत आले आहे. 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ताजे असतानाच व हे प्रकरण तपासावर असताना पुन्हा एकदा या ठिकाणच्या एका रुग्णाचे डुकरांनी लचके तोडल्याचा हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
नांदेड तालुक्यातील धनगरवाडी येथील तुकाराम नागोराव कसबे (वय 35) हा क्षयरोगाने त्रस्त असल्याने त्याला नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर उपचार झाल्यानंतर नऊ नोव्हेंबर रोजी रुग्णालयातून त्याची सुटका झाली आणि तो घरी गेला. परत 10 नोव्हेंबर रोजी परभणी येथील काकाकडे जाण्यासाठी तो दुपारी साडेबाराच्या सुमारास नांदेडच्या रेल्वे स्थानकावर त्याचे वडील नागोराव कसबे यांनी त्याला सोडले. परंतु तो परभणीला न जाता अस्वस्थ वाटू लागल्याने परत विष्णुपुरी रुग्णालयात आला. तेथील नातेवाईकांना वाटप करण्यात येणारे मोफत जेवण घेऊन रुग्णालय परिसरातील चिंचेच्या झाडाखाली तो झोपला. रात्रीच्या वेळी डुकरांच्या कळपाने त्याचे लचके तोडले. यात त्याच्या कमरेखालचा भाग, नाक, गाल दुकारांनी तोडून काढले; यातच त्याचा मृत्यू झाला.
ही धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने धावाधाव करत मृतदेह ताब्यात घेतला. तोपर्यंत नांदेड ग्रामीण पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. ही माहिती मयताचे वडील नागोराव कसबे आणि नातेवाईकांना समजताच त्यांनीही रुग्णालयाकडे धाव घेतली. या घटनेमुळे पुन्हा एकदा नांदेडचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चर्चेत आले आहे. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻