ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- सुपारी देऊन आईनेच आपल्या पोटच्या मुलाचा खून करविला असल्याची धक्कादायक बाब नांदेड जिल्ह्यातील बारड पोलीस स्टेशनअंतर्गत उघडकीस आली आहे. या मुलाच्या खून प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी पकडल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला आहे. बारड शिवारात हा खुन झालेला होता.
मुदखेड तालुक्यातील बारड शिवारात दिनांक 14 आगस्ट रोजी सुशील त्र्यबंकराव श्रीमंगले याचा अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणावरुन खुन केला होता. याप्रकरणी बारड पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेवून अटक करण्याबाबतच्या सुचना देत पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी स्थागुशाचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना आदेशीत केले होते. चिखलीकर यांनी पथके तयार करुन नमुद गुन्ह्यातील आरोपीचा कसून शोध सुरू केला.
दिनांक 17 आगस्ट रोजी रोजी चिखलीकर यांना गुप्त माहीती मिळाली की, गुन्ह्यातील मयताचा खून हा मयताची आई शोभा त्र्यंबकराव श्रीमंगले यांनी इतर दोन व्यक्तींना सोबत घेवुन केला आहे. ही माहीती वरिष्ठांना देवुन स्थागुशाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील संशयित महिला शोभा त्र्यबंकराव श्रीमंगले (वय 55, व्यवसाय- घरकाम, रा. गितानगर नांदेड) यांना ताब्यात घेवुन गुन्ह्यासंबंधाने कसून विचारपुस केली. त्यावेळी त्यांनी सदर गुन्ह्यातील त्यांचा मुलगा (मयत) सुशिल हा नेहमी तिला व तिचे पतीला मारहाण करुन त्रास देत असल्याकारणाने तिचे घरी भाड्याने राहणारा राजेश गौतम पाटील व त्याचा मित्र विशाल देवराव भगत यांना सुपारी देऊन सुशिल याचा खुन करण्यास सांगितले होते.
त्यावरुन स्थागुशाचे पथकाने राजेश गौतम पाटील (वय 27) रा. गितानगर, नांदेड व विशाल देवराव भगत (वय 27) रा. महेबुबनगर, नांदेड यांना ताब्यात घेवुन सदर गुन्ह्यासंबंधाने चौकशी केली असता, सदर खून त्यांनी शोभा श्रीमंगले यांचे सांगण्यावरुन केल्याचे कबूल केले. नमुद तिनही आरोपींना सदर गुन्ह्याचे पुढील तपासकामी बारड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी व्दारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली, सपोनि पांडुरंग माने, शिवसांब घेवारे, पोउपनि सचिन सोनवणे, दत्तात्रय काळे, पोहेकॉ मारोती तेलंग, गुंडेराव करले, पोना विठल शेळके, पोकॉ देवा चव्हाण, मोतीराम पवार, शंकर म्हैसनवाड, मपोकॉ महेजबीन शेख, चा पो कॉ हनुमानसिंग ठाकुर, शेख कलीम यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी कौतुक केले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻