ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे आज सोमवारी पहाटे निधन झाले आहे. मृत्युसमयी ते 70 वर्षांचे होते. 13 ऑगस्ट रोजी त्यांना नांदेड येथून एअर ॲम्बुलन्सने हैदराबाद येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सोमवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
मागील काही दिवसापासून ते आजारी होते. त्यांच्यावर डायलिसिस उपचार करण्यात येत होते. परंतु गेल्या काही काळात वाढत्या दौऱ्यांमुळे व कामाच्या व्यापामुळे त्यांना योग्य वेळी उपचार घेता आला नाही आणि यातच त्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात येते. 13 ऑगस्ट रोजी नांदेड येथील लाईफ लाईन रुग्णालयातून त्यांना एअर ॲम्बुलन्सने हैदराबाद येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. तिथे सुरुवातीला त्यांची प्रकृती स्थिर झाली, मात्र आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला. हैद्राबाद येथील किम्स हॉस्पिटल येथे त्यांच्यावर किडनीच्या आजारावर उपचार सुरू होते. याचदरम्यान आज पहाटे 2 वाजता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, यातच त्यांचे निधन झाले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वसंतराव चव्हाण हे काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून नांदेड लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यांनी भाजपचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव केला होता. माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी अचानक काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी वसंतराव चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला नवसंजीवन दिली होती. 11 ऑगस्ट रोजी काँग्रेसचा नांदेड, हिंगोली, आणि परभणी जिल्ह्याचा मेळावा प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत भक्ति लॉन्स येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या तयारीसाठी खासदार वसंतराव चव्हाण यांनी मोठे प्रयत्न केले होते. त्यांच्या कारकीर्दीतील हा शेवटचा मेळावा ठरला.
सरपंच ते आमदार – खासदार
खासदार वसंतराव चव्हाण यांनी नायगावचे 24 वर्षे सरपंच, नांदेड जिल्हा परिषदेचे सदस्य ते विधानपरिषद, विधानसभा या दोन्ही सदनांचे आमदार आणि आता खासदार अशी विविध पदे भूषविली. त्यांच्या राजकीय कारकीर्दीची ही संक्षिप्त माहिती –
• 1978 नायगांव ग्रामपंचायत सरपंच-1978 ते 2002 (सलग 24 वर्षे)
• 1990-95 जिल्हा परिषद सदस्य, नांदेड जिल्हा परिषद
• 2002 जिल्हा परिषद सदस्य दुसऱ्यांदा निवड.
• 2022 सिनेट सदस्य, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड.
• 2002-2008 आमदार, विधान परिषद, महाराष्ट्र
• 2009-2014 विधानसभा सदस्य, महाराष्ट्र राज्य (अपक्ष)
• 2016-2022 सभापती, कृ.ऊ. बा.समिती नायगांव.
• 2021-2023 चेअरमन, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
• 29 फेब्रुवारी 2024 पासून मुख्य समन्वयक नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी
• 2024 – खासदार, लोकसभा नांदेड
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻