ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ मनसे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार यांचे पत्रक
◆ बाभळीच्या पाण्याचा प्रश्न सुटेपर्यंत नांदेड जिल्ह्यात पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा
नांदेड– तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर अर्थात के. चंद्रशेखर राव यांच्या सभेची जय्यत तयारी सध्या नांदेडमध्ये सुरू आहे. त्यांच्या बीआरएस (भारत राष्ट्र समिती) चे अनेक नेते, मंत्री, खासदार, आमदार या सभेच्या तयारीसाठी नांदेडमध्ये तळ ठोकून आहेत. उद्या रविवार दि. ५ फेब्रुवारी रोजी ही सभा होणार असतानाच ‘मनसे’ने ही सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे.
मनसे नांदेड जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. नांदेड जिल्ह्याच्या धर्माबादजवळील बाभळीच्या पाण्याचा प्रश्न सुटेपर्यंत बीआरएस आणि त्यांचे मुख्यमंत्री केसीआर यांना नांदेड जिल्ह्यात पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
तेलंगणातील भारत राष्ट्र समिती या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आपली पाळेमुळे रोवण्यास सुरुवात केली. बाभळीच्या पाणी प्रश्नावर महाराष्ट्रातील नेत्यांना दोष देवून बीआरएसचा महाराष्ट्राच्या राजकारणात श्रीगणेशा करणार आहे. दि. ५ फेब्रुवारी रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नांदेड येथील सभेने हा श्रीगणेशा होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांच्या निष्काळजीचा फायदा घेत कर्नाटक- बेळगाव सीमावरती भागातील गावांचा प्रश्न व तसेच सीमेवरील गावांचा आणि मराठी भाषिकांवर अन्याय व तसेच पाणी प्रश्नापासून ते रेल्वे प्रश्नापर्यंत जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले असल्याचा ठपका स्थानिक नेत्यांच्या माथी ठेवून, बीआरएस पक्षाच्या वतीने सोडवण्याचे जनतेचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देऊन नांदेड येथून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करीत आहे. परंतु नांदेड जिल्ह्यातील एकही राजकीय पुढारी विरोध करण्यास तयार नसून मूग गळून गप्प बसल्याची टीका मनसे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार यांनी केली आहे.
गोदावरी नदी ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी असून महाराष्ट्रात ५० टक्के भाग ह्या नदी खोऱ्याने व्यापला आहे. गोदावरी खोऱ्यातील भौगोलिक क्षेत्र पाहता उपलब्ध पाण्याच्या झालेल्या वाटपाबाबत केंद्र शासनाने नेमलेल्या न्यायमूर्ती बच्छाव यांच्या अध्यक्षतेखालील लवादाने १९८० मध्ये दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्राला गोदावरी खोऱ्याततील ४९ टक्के भौगोलिक क्षेत्र असताना प्रत्यक्षात पाणी वाटप ३१ टक्के हिस्सा देण्यात आला. तसा अहवाल दिला असताना देखील बीआरएस सरकारच्या मनमानी कारभारामुळे महाराष्ट्राबद्दल दुटप्पी भूमिका घेणाऱ्या सरकारचा मनसेच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे.
आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यात गोदावरी खोऱ्याचे भौगोलिक क्षेत्र केवळ २३ टक्के असताना आंध्रास पाणी वाटप ३० टक्के वाटा देण्यात आला, याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने तीव्र विरोध करण्यात येत असून महाराष्ट्रातील जनतेच्या यामुळे भावना दुखावलेल्या असल्याचे मनसेने म्हटले आहे. तेलंगणातील बीआरएस हा सत्ताधारी पक्ष आपल्या पक्षाचा देशव्यापी विस्तार करण्यास नांदेड येथून प्रारंभ करणार आहे. दिनांक ५ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे पहिली सभा आयोजित करण्यात आली आहे.
आंध्र व तेलंगणा सरकार नांदेड जिल्ह्याच्या धर्माबादजवळील बाभळी पाणी प्रश्नाबाबत दुजाभाव करणाऱ्या बीआरएस पार्टीचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा तीव्र निषेध करून बाभळी पाणी प्रश्न जोपर्यंत मार्गी लागणार नाही तोपर्यंत नांदेडमध्ये पाय ठेवू देणार नाही. काळे झेंडे दाखवूनवून त्यांची नांदेड जिल्ह्यात होणारी पहिली सभा उधळून लावू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष मोंटीसिंग जहागीरदार यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
