ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
•👆🏻महाराष्ट्रातील भाजप उमेदवारांची पहिली यादी
नवी दिल्ली/ नांदेड – भाजपचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना भारतीय जनता पक्षाने पुन्हा नांदेड लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी महाराष्ट्रातील उमेदवारांच्या पहिल्याच यादीत स्थान पटकावले आहे. भाजपने आज महाराष्ट्रातील २० जागांवरील उमेदवार जाहीर केले असून लातूरमधून विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे तर बीडमधून पंकजा मुंडे यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे.
सुरुवातीला १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर भाजपच्या केंद्रीय कार्यकारणी समितीने आज १३ मार्च रोजी दुसरी यादी जाहीर केली आहे. यात जवळपास ७२ जणांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यात नांदेडची उमेदवारी विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना देण्यात आली आहे. चिखलीकर यांना उमेदवारी मिळणार की नाही याबाबत नांदेडमध्ये तर्कवितर्क लढवले जात होते, पण त्यांना पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर झाली आहे.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रतापराव पाटील चिखलीकर यांना पक्षात ब्रेक लागतो की काय अशा चर्चांना पेव फुटले होते. एवढेच नाही तर छत्रपती संभाजीनगर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या स्नुषा डॉक्टर मीनल खतगावकर यांनी नांदेडच्या उमेदवारीवर दावा केला होता. त्यानंतर नांदेडमध्ये चांगलेच राजकीय खलबत्त सुरू झाले होते. खा. प्रतापराव पाटील यांचे तिकीट कापल्या जाणार की काय अशा चर्चा सुरू झाल्या तर तिकडे त्यांची बहिण तथा आमदार शामसुंदर शिंदे यांची पत्नी आशाताई शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चांही रंगल्या होत्या.
मागील आठवड्यात खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपले वजन वापरत व मुंबईत तळ ठोकून अखेर उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव तथा मुख्यालय प्रभारी अरुणसिंह यांनी दुसऱ्या फेजमधील यादी जाहीर केली आहे. यात ७२ जणांची नावे जाहीर झाली आहेत. नांदेडला खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, लातूरला सुधाकर शृंगारे, बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडे तर जालना लोकसभेसाठी रावसाहेब दानवे यांना संधी देण्यात आली आहे. खासदार चिखलीकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांच्या समर्थकांमधून आनंद व्यक्त होत आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻