Sunday, June 16, 2024

नांदेडमध्ये खळबळ: उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांची आमदारकी रद्द करण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव; एकूण १६ आमदारांवर कारवाईचे पत्र

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

मुंबई/ नांदेड- एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर आता शिवसेनेनेही वेगवान हालचाली करत आधी १२ आणि आता ४ अशा एकूण १६ आमदारांचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे केली आहे. या १६ आमदारांमध्ये नांदेड उत्तरचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांच्याही नावाचा समावेश असून या वृत्ताने नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बालाजी कल्याणकर हे पहिल्यांदाच आमदार झालेले असून पहिल्याच टर्ममध्ये त्यांना अपात्रतेसारख्या कारवाईची लढाई लढावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.

संबंधित बातमी 1 👇🏻

एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारुन शिवसेनेला आव्हान दिल्यानंतर आता शिवसेनेकडून जोरदार  घडामोडी सुरू झाल्या आहेत. आज या बंडावर आक्रमक पवित्रा घेत शिवसेनेने १६ बंडखोरांचे सदस्यत्व अर्थात आमदारकी रद्द करण्याची शिफारस केली आहे. तसे पत्र शिवसेनेच्यावतीने विधानसभेकडे देण्यात आले आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात राजकीय वर्तुळ हादरले आहे. शिवसेना आमदारांचा एक मोठा गट घेऊन एकनाथ शिंदे सुरतला पोहोचले. त्यानंतर सर्व आमदारांना गुवाहाटीला नेण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ अनेक आमदार गुवाहाटीत जाऊन पोहोचले आहेत.

संबंधित बातमी 2 👇🏻

अचानक झालेल्या या बंडानंतर आता शिवसेनेनं बंडखोर आमदारांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेने १२ आमदारांच्या निलंबनाची मागणी आधी केली होती. आता या १२ जणांमध्ये आणखी ४ जणांची भर पडली असून एकूण १६ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी आता विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आली आहे.त्यामुळे एकूण १६ जणांची आमदारकी रद्द करण्याची आक्रमक कारवाई शिवसेनेकडून करण्यात आली येत असल्याचे दिसून येत आहे.

१२ आमदारांमध्ये आणखी ४ जणांची भर
१. चिमणराव पाटील
२. संजय रायमूलकर
३. बालाजी कल्याणकर
४. रमेश बोरनारे

शिवसेनेची विधी विभागाच्या एका शिष्टमंडळाने  विधानभवनात १६ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणार पत्र विधानसभा उपाध्यक्षांना दिले असून, आता उपाध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे. शिवसेनेच्या विधी विभागाच्या शिष्टमंडळासोबत नव्याने नियुक्त शिवसेना विधीमंडळ गटनेता आमदार अजय चौधरी, प्रतोद पद सुनिल प्रभू यांच्यासह मंत्री उदय सामंत, खासदार अरविंद सावंतही होते.

एकूण या १६ आमदारांवर कारवाईचे पत्र
१) संजय शिरसाट
२) अब्दुल सत्तार
३) भरत गोगावले
४) संदीपान भुमरे
५) महेश शिंदे
६) अनिल बाबर
७) बालाजी कल्याणकर
८) एकनाथ शिंदे
९) लता सोनावणे
१०) प्रकाश सुर्वे
११) यामिनी जाधव
१२) तानाजी सावंत
१३) रमेश बोरनारे
१४) चिमणराव पाटील
१५) संजय रायमूलकर
१६) बालाजी किणीकर

एकनाथ शिंदे यांच्यासह हे १६ आमदार शिवसेनेच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, म्हणून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणारी याचिका विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आली आहे. दरम्यान, आज सकाळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर मविआ सरकार आणखी अडीच वर्षे पूर्ण करणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसंच आमचा सामना करण्यासाठी मुंबईत या आम्ही तयार आहोत, असं आव्हानही राऊतांनी शिंदे गटाला दिलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडूनही जोरदार हालचाली, ३७ आमदारांच्या सह्यांचं पत्र

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यातून अधिकृतरित्या सुटका करून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. कारण या कायद्याच्या नियमानुसार कारवाई होऊ नये यासाठी लागणाऱ्या एकूण दोन तृतीयांश शिवसेना आमदारांच्या सह्याचे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पाठवण्यात आले आहे.

घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत. आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत. कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेनेचे एकूण ५५ आमदार असून पक्षातून वेगळा गट स्थापन करायचा असल्यास किमान दोन तृतीयांश आमदारांचे संख्याबळ पाठीशी असावे लागते. त्यासाठी शिंदे यांना ३७ आमदारांची गरज होती ती आता पूर्ण झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ३७ आमदारांच्या सह्याचे पक्ष विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधीमंडळ सचिव राजेंद्र भागवत आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवले आहे. यामध्ये सर्व ३७ बंडखोर आमदारांच्या सह्या आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!