Monday, June 17, 2024

नांदेडमध्ये पावसाचा हाहाकार: गोदावरी-आसना नदी दुथडी, अनेक गावांचा संपर्क तुटला; अंडरब्रिज पाण्याखाली, विष्णुपुरीचे तीन दरवाजे उघडले; वीज पडून मुलीचा मृत्यू

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

हजारो हेक्टर शेती बाधित

नांदेड- जिल्ह्यात दोन दिवसापासून जोरदार पाऊस सुरू असल्याने सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील महत्त्वाची गोदावरी आसना आणि मन्याड तसेच पैनगंगा दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. स्वतः जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर, एसडीआरएफचे पथक यासोबतच अग्निशमन दलाचे पथक तसेच गोदावरी जीव रक्षक, पोलीस विभाग पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आसना नदीच्या निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील काही नागरिक अडकून पडले होते. तसेच अर्धापूर तालुक्यातील शेलगाव व मेंढला येथील झारखंडचे दोन कामगार अडकून पडल्याने त्यांनाही एसडीआरएफच्या पथकाने रेस्क्यू केले आहे. नांदेड शहरातील अंडरब्रिज पाण्याखाली आला असून या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. भोकर तालुक्यात वीज पडून एका मुलीचा मृत्यू झाला आहे.

विष्णुपुरी प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडले
जिल्ह्यात व शेजारी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने छोट्या-मोठ्या नदी नाल्यांना पूर आला आहे. हे नदी नाले गोदावरीवर असलेल्या विष्णुपुरी प्रकल्पात मिसळत असल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. सध्या 71 टक्के भरलेला विष्णुपुरी प्रकल्प त्यातून खबरदारी म्हणून तीन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. १,०५३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सध्या सुरू असून गोदाकाठावरील सर्व गावातील नागरिकांना, शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दोन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात सूर्यदर्शन नाही. तसेच हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरच्या बाजूला मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने विष्णुपुरी प्रकल्पात पाण्याचा येवा तितका झपाट्याने वाढत आहे. शनिवार दि. 9 सकाळपासून गेट नंबर सहा, सात आणि आठ असे तीन दरवाजे उघडण्यात आले होते. त्यापैकी आठ क्रमांकाचा दरवाजा दुपारी पाच वाजता प्रशासनाने बंद केला आहे. आता सध्या सहा आणि सात या दरवाजामधून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. गोदावरी नदी भरून वाहत असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणून नागरिकांनी नदीत किंवा नदी काठावर थांबू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नदी काठावरील आमदुरा, पुणेगाव, वांगी, बोंडार, त्रिकूट, गाडेगाव आदी गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहनही करण्यात आले आहे. रात्रभर असाच जर पाऊस पुन्हा सुरू राहिला तर परत विष्णुपुरी प्रकल्पाचे अजून काही दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वीज पडून एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू
भोकर तालुक्यात शुक्रवारी रात्रीपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहत असल्याने तालुक्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटल्याचीही माहिती प्राप्त झाली आहे. याच दरम्यान दि.९ जुलै रोजी सकाळी ११ च्या दरम्यान  तालुक्यातील मौ. भुरभुशी येथे वीज पडून एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर पुरात अडकलेल्या दोन शेतकऱ्यांना बैलांमुळे जीवदान मिळाले आहे.

सिडको हडको परिसरासह कौठा भागात मुख्य रोडवर दुतर्फा मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने वाहतूक विस्कळित झाली होती. अखेर सिडको क्षेत्रीय कार्यालय चा स्वच्छता पथकाने पाण्याचा निपटारा केल्या नंतर वाहतूक सुरळीत झाली तर अनेक सखल भागात संततधार पावसामुळे पाणी साचले होते.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः प्रवासामध्ये असताना हिंगोलीचे जिल्हाधिकारी पापळकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून पूर परिस्थिती निर्माण झालेल्या भागातील नागरिकांना सर्वतोपरी मदत करा. प्रशासनाच्या सर्व यंत्रणा वापरा. नागरिकांना कुठेही धोका होणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना दिल्या. तसेच नांदेडचे जिल्हाधिकारीही मुख्यमंत्री यांच्या संपर्कात असून जिल्ह्यात सध्याची जरी परिस्थिती टोकाची असली तरी जीवित हानी झाली नाही.

नांदेडमध्ये आसना नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावातील नदीकाठच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. शेतावर उभे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका या पुरात बसला आहे. पासदगाव, सांगवी, तरोडा,  महादेव पिंपळगाव, शेलगाव, त्रिकूट, गाडेगाव, ब्राह्मणवाडा, कामठा, पुणेगाव, निळा या भागातील शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन यांनी प्रत्यक्ष पूर परिस्थितीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. तसेच पूरग्रस्तांना धीर देऊन मदत केली.  गोदावरी नदीवर असलेल्या विष्णुपुरी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने प्रकल्पाचेही तीन दरवाजे उघडण्यात आले होते. त्यापैकी एक दरवाजा बंद करण्यात आला आहे.

अंडरब्रिज पाण्याखाली
शहरातील हिंगोली गेट आणि लालवाडी  हे दोन्ही अंडरब्रिज पाण्याखाली आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद आहे. तसेच सखल भागात अनेक नागरिकांच्या घरामध्ये रस्त्यावरील घाण पाणी शिरल्याने सर्वत्र वातावरण दूषित झाले आहे. आज दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने सर्वत्र चिखलांचा सामना नागरिकांना करावा लागला. त्यातच शहरातील रस्त्यांची कामे हाती घेतल्याने सर्वत्र चिखल आणि विस्कळीत झालेली वाहतूक यामुळे नागरिकांचा चांगलाच दम कोंडला. बाजारपेठही पावसामुळे आज सुनसान दिसत होत्या.

एरवी गर्दीने व माणसाने फुलणाऱ्या रस्त्यावर तितक्याच प्रमाणात शुकशुकाट दिसत होता. नदी नाल्यांना पूर आल्याने शहरातील नाले नदी आपल्या पात्रता घेत नसल्याने शहरातील पाणी शहरातच जिथे मिळेल तिथे सखल भागात थांबले. यामुळे अनेक मार्गावरून वाहनधारकांना कसरत करून आपली वाहने चालवावी लागली. सायंकाळी सहा नंतर काही प्रमाणात पावसाचे रिपरिप कमी झाल्याने दिवसभरापासून घरात बसलेले नागरिक रस्त्यावर आले. आसना व गोदावरीचा पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!