ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- येथील जिल्हा न्यायालयात दरोडा व जबरी गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराला साक्षनिमित्त बोलावले असता त्याने चक्क जिल्हा न्यायाधीश (प्रथम) शशिकांत बांगर यांच्या दिशेने चप्पल भिरकावली. यावेळी न्यायालयात एकच गोंधळ उडाला. या धक्कादायक प्रकारानंतर न्यायाधीश बांगर यांनी आरोपी दत्ता हंबर्डे याला जागेवर लगेचच सहा महिने शिक्षा व एक हजार रुपये रोख दंडाची शिक्षा सुनावली.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत विष्णुपुरी येथील आरोपी दत्ता हरी हंबर्डे याच्याविरुद्ध दरोडा, जबरी चोरी यासह अनेक गंभीर गुन्हे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तो मागील काही दिवसांपासून नांदेडच्या मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे. त्याला व त्याच्या इतर साथीदाराला जिल्हा न्यायाधीश (प्रथम) शशिकांत बांगर यांच्या न्यायालयासमोर साक्षीसाठी बोलावण्यात आले होते.
यावेळी साक्ष सुरू असतानाच आरोपी दत्ता हंबर्डे यांनी आपल्या शर्टच्या खिशात आणलेली चप्पल न्यायाधीश बांगर यांच्या दिशेने भिरकावली. मात्र चप्पल डायसच्या अलीकडेच पडल्याने अनर्थ टळला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पोलीस यंत्रणा व न्यायालयीन कर्मचारी यांच्यात एकच खळबळ उडली. पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेऊन बाजूला केले.
या धक्कादायक प्रकारानंतर न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी चप्पल भिरकावल्याप्रकरणी कुठलाही युक्तिवाद न करता जागेवरच आपल्या अधिकारात सदर आरोपीला सहा महिने शिक्षा आणि एक हजार रुपये दंड आणि एक हजार रुपये दंड नाही भरल्यास वाढून एक महिन्याची शिक्षा सुनावली. या प्रकरणामुळे मात्र न्यायालयाच्या व न्यायाधीशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जिल्हा कारागृहातून आरोपींची तपासणी व अंगझडती न घेता तसेच न्यायालयात हजर करण्यात आल्याने हा प्रकार घडला असावा अशी चर्चा होत आहे. या प्रकरणाची सध्यातरी पोलिसात नोंद करण्यात आली नव्हती. कारागृहातून ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी या आरोपींना न्यायालयात हजर केले, त्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये मात्र घबराट पसरली आहे. या पोलिसांवर न्यायालय व पोलीस विभागाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻