ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– येथील हजुर साहेब रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक चारच्या एक्सलेटरच्या बाजूला एका साठ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. विशेष म्हणजे हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आहे. हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला याचाच अर्थ हा मृतदेह अनेक दिवसांपासून प्लॅटफॉर्म वर पडलेला असणार हे स्पष्ट असून रेल्वे प्रशासनाच्या या दुर्लक्षाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
नांदेड शहराच्या हजूर साहिब रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर एक्सलेटरच्या बाजूला एक मृतदेह असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना रेल्वे प्रशासनाने कळविले. लोहमार्ग पोलीस हवालदार उत्तम कांबळे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार पराते यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. त्या मृतदेहाची दुर्गंधी पसरली होती. याच अवस्थेत पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे.
सदर मयताचे वय अंदाजे 60 ते 65 वर्षे, शरीर बांधा मजबूत, उंची साडेपाच फूट, रंग सावळा, दाढी पांढरी, चेहरा गोल, उजवा पाय घुटण्यापासून तुटलेला, अंगात पिवळ्या रंगाचा फिकट शर्ट अशा वर्णनाचा इसम कोणाचा नातेवाईक असल्यास लोहमार्ग पोलीस ठाणे किंवा पोलीस हवालदार उत्तम कांबळे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
दररोज हजारो प्रवासी ये- जा करणाऱ्या अशा वर्दळीच्या प्लॅटफॉर्मवरील या मृतदेहाकडे रेल्वे प्रशासनातील कुणाचेच लक्ष कसे गेले नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻