ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड – नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर या दोन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून बंडखोरी झाली आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये या दोन्ही जागा शिवसेना शिंदे गटाला सुटलेल्या असून भाजप नेत्यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना उमेदवारांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
सत्ताधारी महायुतीच्या जागा वाटपात नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर हे हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेल्या. त्यानुसार नांदेड उत्तर मधून शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर यांना तर नांदेड दक्षिण मधून शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंद पाटील बोंढारकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
परंतु, आता या दोन्ही मतदारसंघांमध्ये महायुतीतील वाद समोर आला आहे. नांदेड उत्तर मध्ये भाजपचे मिलिंद देशमुख यांनी बंडखोरी केलेली असतानाच नांदेड दक्षिणमधूनही भाजपचे महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते आणि संजय पाटील घोगरे या दोन भाजप नेत्यांनी बंडखोरी केली असून आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण या दोन्ही मतदार संघातील शिवसेना उमेदवारांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. नांदेड दक्षिण मतदार संघातून महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे विद्यमान आमदार मोहनराव हंबर्डे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻