ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
अर्धापूर (जि. नांदेड): तालुक्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील कन्येने अटकेपार झेंडा रोवला आहे. अर्धापूर तालुक्यातील कोंढा या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबातील लेक रेवा दिलीप जोगदंड हिने आकाश भरारी घेत अमेरिकेत नेव्हल एअरफोर्स फ्लाईट कमांडर पदाला गवसणी घातली आहे. तिच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
शेतकरी चळवळीचे गाव म्हणून कोंढा गावाची राज्यात ओळख आहे. शेती हा येथील प्रमुख व्यवसाय. येथील शेतकरी कष्टाळू व तितकेच हौशी असुन येथील एका शेतकऱ्याने आपल्या लाडक्या लेकीची पाठवणी हेलीकाॅप्टरने तिन वर्षंपुर्वी केली होती. ही घटना राज्यभर चर्चेत होती.
त्यानंतर येथील कन्येने गतवर्षी अमेरिकेत विमान चालविण्याचे प्रशिक्षण घेत विमान उडवून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला होता. याच जिगरबाज लेकीने अर्थात रेवा जोगदंड हिने तिच्या कर्तबगारीने आता अमेरिकेत एअरफोर्समध्ये फ्लाईट कमांडर पदाला गवसणी घातली आहे. गत दोन वर्षापासून तिने यासाठी अथक परिश्रम घेतले होते. या पदासाठी ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी २६ जणांची निवड झाली, त्यापैकी एकमेव रेवा जोगदंड ची फ्लाईट कमांडर पदावर वर्णी लागली आहे.
अर्धापूर तालुक्यातील कोंढा जि. नांदेड येथील जोगदंड कुटुंबातील मुलीने साता समुद्रापार डंका वाजवत अमेरिकेत देशाचे, राज्याचे आणि आपल्या गावाचे नाव चमकवले आहे. यामुळे “हौसेसाठी काय पण” करणारे कोंढा गाव पुन्हा चर्चेत आले आहे. तिच्या या कामगिरीने जोगदंड कुटूंबियासह संपूर्ण कोंढेकर ग्रामस्थांचा उर अभिमानाने भरून आला आहे.
कोंढा येथील रहिवासी असलेले केशवराव बालाजी जोगदंड यांचा मुलगा दिलीप केशवराव जोगदंड हे ०९ वर्षांपूर्वी अमेरिकेला स्थायिक झाले आहेत. तेथे त्यांनी स्ट्रिंग कंट्रोलेड दोरीवर विमान उडवून दाखविणे या विषयी संशोधन करून यशस्वी प्रयोग केला. याचा प्रभाव त्यांची मुलगी कु. रेवा दिलीप जोगदंड हिच्या बालमनावर पडला. तेव्हापासून तिने भविष्यात पायलट होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पुढील वाटचाल सुरु केली. आणि हे स्वप्न सत्यात उतरवले आहे.
रेवा दिलीप जोगदंड हिच्या या यशाबद्दल तिचे आणि जोगदंड परिवाराचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. आपल्या गावातील मुलीने अमेरिकेत जाऊन पायलट होण्याचे स्वप्न साकार करत अमेरिकेत कमांडर पदाला गवसणी घातली असल्याने ग्रामस्थांचा उर अभिमानाने भरुन आला आहे. तिचे हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी असेच आहे.
अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील व्यवसाय हा शेती आहे. तरीही शेती व्यवसायातून येथील काही सुज्ञ कुटुंबांनी मोठी प्रगती साधली आहे. “एक गाव एक लग्न तिथी” या उपक्रमाचा येथे दरवर्षी अवलंब केला जातो. त्याच बरोबर शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सातत नवनवीन प्रयोग केले जातात. येथील नागरिकांनी आधुनिक टेक्नॉलॉजी आत्मसात करुन नवनवीन व्यवसायात यशस्वी पाऊल टाकले आहे. मागील दोन वर्षांपूर्वी राम कदम या प्रगतीशील शेतकऱ्यांने आपल्या बहिणीला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी तिच्या लग्न समारंभात हेलीकॉप्टरमधून वरात काढून तिची सासरी पाठवणी केली होती. यामुळे कोंढा हे गाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले होते. आता रेवाने विदेशात जाऊन गावाचे नाव रोशन केल्याने कोंढा गाव पुन्हा चर्चेत आले आहे.
आई – वडील सॉफ्टवेअर इंजिनियर
दिलीप जोगदंड हे अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. त्यांनी कोंढा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतले. नंतर नांदेड, अकोला येथे इंजिनियरिंगचे शिक्षण घेत पुणे येथे एमबीए, सॉफ्टवेअर इंजिनियर असे शिक्षण घेत तेथेच नोकरीही केली. त्यानंतर परदेशात जाऊन लंडन ३ वर्षे, ऑस्ट्रेलिया ४ वर्ष व अमेरिका ९ वर्ष असे १६ वर्षे विविध देशात त्यांनी काम केले. त्यांच्या पत्नीचेही सॉफ्टवेअर इंजिनियरचे शिक्षण झालेले आहे. त्यांना मोठी रेवा जोगदंड व छोटी इरा जोगदंड अशा दोन मुली आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻