Monday, October 14, 2024

नांदेड जिल्ह्यात एसटी महामंडळाचा कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा; २५ कर्मचारी बडतर्फ

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

पोलीस बंदोबस्तात सोळा बसेस सुरु -संजय वाव्हळे

नांदेड- बडतर्फी, निलंबन कारवाईनंतरही मागील अडीच महिन्यापासून एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. मात्र हळूहळू या संपामध्ये फूट पडत असल्याने नांदेड जिल्ह्यात आज सोळा बसेस पोलीस बंदोबस्तात धावत आहेत. तसेच 25 कर्मचारी बडतर्फ झाले असून 300 हून अधिक कर्मचारी निलंबित आहेत. या संपामुळे प्रवाशांना चांगलाच फटका बसला असून अवैध वाहतूक करणाऱ्यांचे मात्र उखळ पांढरे झाले आहे.

मागील अडीच महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू असल्याने लाल परीची चाके जाग्यावरच थांबली आहेत. हजारो कोटी रुपयांचा फटका महामंडळाला बसत आहे. प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असून खासगी वाहनांनाही प्रादेशिक परिवहन विभागाने प्रवासी वाहतूक करण्याची मुभा दिली असली तरी त्यांच्याकडून मात्र पुरती प्रवाशांची लूट होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.

या संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला असून नांदेड जिल्ह्यात नऊ आगाराअंतर्गत एकूण 25 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. तर तीनशेहून अधिक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहेत. बुधवार, दि. 5 रोजी सोळा बसेस पोलीस बंदोबस्तमध्ये प्रवाशांच्या सेवेत सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे वयाची 62 वर्षे ज्यांनी ओलांडली नाही अशा सेवानिवृत्त झालेल्या चालकांना 26 हजार रुपये मानधनावर सेवेत घेण्याचा आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे. ज्या ठिकाणाहून सदर चालक सेवानिवृत्त झाला त्या ठिकाणी त्याने सेवा करण्याची संधी द्यावी असा अर्ज करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. राज्यात जवळपास आजपर्यंत 1,144 कर्मचारी बडतर्फ करण्यात आले असून 11, 024 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यात हळूहळू एसटी बस सुरू होत असल्याने प्रवाशांनाही दिलासा मिळत असून एसटीचे उत्पन्न हळूहळू वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वरिष्ठ स्तरावरून अजूनही काही कर्मचारी बडतर्फ तर काही निलंबन होणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संजय वाव्हळे यांनी “गोदातीर समाचार” शी बोलताना सांगितले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!