Friday, November 8, 2024

नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान; अनेक तालुक्यात अतिवृष्टी, मुखेड तालुक्यात एक जण वाहून गेला, तलाव फुटून गावांमध्ये पाणी शिरले

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆अनेक गावांचा संपर्क तुटला, शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

◆जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची पूरग्रस्त भागास भेट

नांदेड/ मुखेड (प्रल्हाद कांबळे/ सन्मुख मठदेवरू)– जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाने थैमान घातले आहे. विशेषत: बिलोली, किनवट, माहुर, देगलूर आणि मुखेड तालुक्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. गुरुवारपासून सुरू झालेल्या जिल्हाभरातील पावसाने सर्वत्र थैमान घातले आहे. जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यात एक जण वाहून गेला आहे. तर जिरगा येथील पाझर तलाव फुटून अनेक गावात पाणी शिरले आहे.

जिल्ह्यात एकूण 36 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात ७०.३५ मिमी पाऊस झाला आहे. विशेष करून जिल्ह्यातील अनेक गावांचा पुरामुळे संपर्क तुटला असून शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे पूरग्रस्त भागामध्ये जाऊन पाहणी करून यंत्रणेला सूचना देत आहेत. अनेक भागात शेतकऱ्यांकडील जनावरं मृत्युमुखी पडले असून हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार दि.२० जुलै रोजी दिवसभराच्या रिपरिपिनंतर बाऱ्हाळी मंडळात रात्री ८ पासून विजेच्या कडकडाटासह व वादळी वाऱ्यासह ढगफूटी सदृश्य पाऊस झाला. रात्री आठ वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत तुफान पाऊस चालूच होता. तब्बल चार तास अतिवृष्टी झाल्याने  सर्वच नदी – नाल्यांना महापूर आला. यामध्ये माकणी (ता. मुखेड ) येथिल एक तरुण धोंडीबा गोविंद होळगीर वाहून गेल्याने त्याचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

नांदेड जिल्ह्यात काल गुरुवारपासून पावसाला सुरुवात झाली असून आज शुक्रवारी सायंकाळपर्यंत संततधार सुरू आहे. या पावसात अनेक भागातील रस्ते वाहून गेले आहेत. प्रशासनाच्यावतीने बाधित नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. विशेष म्हणजे धर्माबाद तालुक्यातील वन्नाळी, बिलोली तालुक्यातील नागणी, माचनूर, गंजगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ओढ्याला पाणी आल्याने या गावाचा संपर्क तुटला आहे. हरणाळी गावात पाणी शिरले असून कुंडलवाडी, हराळी जाणारा रस्ता बंद झाला आहे. गंजगाव कारला नाल्यावर पाणी आले आहे. बिलोलीतील कासराळी, माचनूर, नागणी, गंजगाव शिरड हे रस्ते बंद झाले आहेत.

देगलूर तालुक्यातील नांदेड- हैदराबाद रोडवरील लखा या गावाचा संपर्क तुटला आहे. वन्नाळी ते वझर दरम्यानच्या रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली. वन्नाळी व सुंदगी गावातील घरामध्ये पाणी शिरले. देगलूर शहरातील दत्तनगर भागात रस्त्याचे काम चालू असल्याने काही घरांमध्ये पाणी शिरले. तर इकडे नांदेड शहरातही अनेक सखल भागात पाण्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापनाचे जवान, गोदावरी जीव रक्षक, पोलीस प्रशासन, गृहरक्षक दलाचे जवान पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी देगलूर, बिलोली तालुक्यात जाऊन प्रत्यक्ष पूर परिस्थितीची पाहणी केली. पुरात अडकलेल्यांना व सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

इकडे नांदेड शहरात सर्वत्र पावसाचे पाणी रस्त्यावर जमा झाले. काही वस्त्यांमध्ये पाणी शिरले. खडकपुरा, वसंतनगर, इस्लामपुरा, शक्तीनगर, साईनगर, बालाजी नगर, तानाजी नगर, देगलूर नाकाचा काही भाग या परिसरात नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. महापालिकेच्या वतीने पाणी शिरलेल्या भागात पाण्याचा निचरा व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. विष्णुपुरी 90 टक्के भरले असून एक दरवाजा उघडून पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात येत आहे. गोदावरी नदी काठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. आज दिवसभर सूर्यदर्शन झाले नसून पावसाची रिपरीप सुरू आहे. त्यामुळे शहरातील वर्दळ आणि बाजारपेठा मंदावल्या होत्या. शाळांना आज सुट्टी दिल्याने बच्चे कंपनी रस्त्यावर दिसून येत नव्हती.

बाऱ्हाळी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस, सर्वच नदीनाल्याना पूर

नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी मंडळात २० जुलै रोजी रात्री ८ वा. पासुन पावसाची संततधार सुरु झाली, ती मध्यरात्री १२ पर्यंत कायम होती. या चार तासात तब्बल २८८ मी.मी . इतका प्रचंड पाऊस झाला. एकाच दिवशी इतका प्रचंड पाऊस मागच्या पन्नास वर्षांत कधी झाला नसल्याचे जुन्या पिढीतील नागरिकांकडून सांगितले जात आहे. या ढगफूटी सदृश्य पावसाने सर्वच नदी -नाल्यांना पुर आला .या एकाच पावसात कुंद्राळा मध्यम प्रकल्प ओहरफ्लो झाला. तर येथून जवळच असलेला जिरगा ता. मुखेड येथील पाझर तलाव मध्यभागातुन फुटला. त्यामुळे कुंद्राळा नदीला प्रचंड पुर आला. या नदीचे पाणी थोटवाडी , बाऱ्हाळी , हिंपळनारी , भेंडेगाव (बु), भेंडेगाव(खु), भिंगोली या गावात शिरले अनेकांच्या घरात पाणी शिरले. 

गावकर्‍यांच्या मदतीने या गावातील नागरीकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. त्यामुळे माकणी येथील दुर्दैवी घटना वगळता इतर ठिकाणी सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. मात्र अनेकाच्या शेळ्या , कोंबड्या व इतर पाळीव जनावरे वाहून गेली. तर बाऱ्हाळी येथील खंडू येरगलवाड या शेतकर्‍याची झाडाला बांधलेली म्हैस पुराच्या पाण्यात अडकल्याने जागीच मृत्यु पावली. याच शेतकऱ्याच्या दोन वागणारी पूरात वाहून गेल्या. बा-हाळीसह वडगाव, निवळी, भिंगोली, भेंडेगाव आदी ठिकाणी घरांची पडझड झाली. त्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत.

प्रचंड पाऊस झाल्याने बाऱ्हाळी येथील जुना बस स्थानक परिसरात रस्त्यावरील पाणी अनेकांच्या दुकानात शिरल्यामुळे दुकानातील  सामानाचे नुकसान झाले. दुकानातील पाणी बाहेर काढण्यासाठी मोटार पंप लावावे लागले. ढगफूटीच्या पावसामुळे शेतातील पिकासह जमीनी खरडून गेल्यामुळे शेतकर्‍याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कुंद्राळा नदीला आलेल्या पुरामुळे देगलुर – बाऱ्हाळी रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे नदीपलीकडील गावांचा संपर्क तुटला आहे.  या अतिवृष्टीत विज वितरण व्यवस्थेचेही मोठे नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी विजेचे डी.पी. पोल, तारा पडल्या आहेत, त्यामुळे येथिल ३३ के.व्ही उपकेंद्रातुन ग्रामीण भागात होणारा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकरी हतबल झाल्याचे चित्र या भागात दिसुन येत आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!