Sunday, June 4, 2023

नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस: आसना नदी धोक्याच्या पातळीवर, अनेक महामार्ग वाहतुकीसाठी बंद; अर्धापूर तालुक्यात काही गावांचा संपर्क तुटला, बामणी येथे कामगार पुराच्या पाण्यात अडकले, एनडीआरएफ टीमसह जिल्हाधिकारी घटनास्थळी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

शहरात अनेक सखल वस्त्यामध्ये पाणी शिरले

पुराचा व्हिडिओ 👆🏻

https://fb.watch/e8-VOYk3ck/

नांदेड- शहर व जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस होत आहे, त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. नांदेड शहरासह अनेक जागी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून अनेक शाळांनी आज सुट्टी जाहीर केली आहे. पावसाची संततधार अद्याप सुरूच आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. दरम्यान पाणी साचल्यामुळे अनेक महामार्ग ठप्प झाले आहेत. अर्धापूर तालुक्यात काही गावांचा संपर्क तुटला असून बामणी येथे कामगार पुराच्या पाण्यात अडकले होते. मदत कार्यासाठी एनडीआरएफ टीमसह जिल्हाधिकारी दाखल झाले आहेत.

नांदेडच्या आसना नदी पात्राने धोक्याची पातळी ओलांडली असून तरोडा नाका ते वसमत जाणाऱ्या मालेगाव रोडवरील पासदगाव येथील पुलावरून पाणी जात असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच लातूर फाटा, धनेगाव, मुजामपेठ, इस्लामपुरा, खडकपुरा, दत्तनगर विशेष म्हणजे उच्चभ्रू वस्ती असलेल्या वसंतनगर, जुन्या नांदेड शहरातील चौफाळा, ब्रह्मपुरी, भावेश्वरनगर, बिलालनगरचा काही भाग, देगलूर नाका परिसरातील अनेक नगरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडत आहे. महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन जागोजागी नागरिकांना मदत करत असल्याचे पहावयास मिळत आहे. मुखेड तालुक्यातही पावसाने हाहाकार माजविला असून शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. यासोबतच अर्धापूर, मुदखेड, उमरी, सोनखेड परिसरात नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. यंदाच्या पावसाळ्यातील हा पहिलाच मोठा पाऊस आहे. दरम्यान, नांदेडमध्ये पूर सदृश्य स्थिती निर्माण झाल्यास एसडीआरएफचे एक पथक तैनात  ठेवण्यात आलेले आहे. तसेच ओढे आणि नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

नांदेड शहरातील पद्मजा सिटी परिसरात पावसामुळे नागरिकांना घरी जाता येत नाही प्रशासनाकडून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस पडत असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुदखेड तालुक्यातही पावसाचा हाहाकार

सीता नदीला पूर आल्याने पार्डी वैजापूर या गावात पाण्याचा वेढा, तसेच मुदखेड शहरात नंदीनगरात पाणी शिरले. यासोबतच मुदखेड- नांदेड मेंडका नदीला पूर आल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुदखेड भोकरही रस्ता बंद करण्यात आला असून तालुक्यातील राजवाडी येथून बैलजोडी वाहून गेल्याची माहिती मिळत आहे.

यासोबतच अर्धापूर ते मालेगाव जाणारा रस्ता महामार्ग पोलीस चौकीच्या पुढे मेंडका येथे पूल खचत असल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. महामार्गाचे पोलीस त्या ठिकाणी तळ ठोकून असून पूलाचा एक भाग चांगलाच खचला आहे.

अर्धापूर तालुक्यात काही गावांचा संपर्क तुटला, बामणी येथे कामगार पुराच्या पाण्यात अडकले; मदत कार्यासाठी एनडीआरएफ टीमसह जिल्हाधिकारी दाखल

अर्धापूर– गेल्या दोन दिवसापासून तालुक्यात जोरदार पावसाने सुरुवात केली असून काल रात्री झालेल्या पावसाने तालुक्यात बामणी येथील पुलाच्या कामावरील मजुर पुरात अडकले होते.याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांना मिळताच एनडीआरएफ टीम घेऊन रेस्क्यू करीत मजुरांना सुरक्षित बाहेर काढले आहे. तालुक्यातील अनेक गावात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे तर काही लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत तर शेतकऱ्यांच्या शेती खरडून मोठे नुकसान झाले आहे.

शेलगाव येथील नागरिकांचा संपर्क तुटला

मेनला नाला असना नदीस पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून शेलगाव येथील पुलावण पाणी जात असल्यामुळे संपर्क तुटला आहे तर अनेकांचे पशुधन पाण्यात अडकले आहेत.

बामणी येथे कामगार पुरात अडकले

बामणी,मेंढला,सांगवी,कोंढा,गणपूर,सावरगाव,लोणार नाल्याला पूर आला असून त्यामुळे येथील पुलाचे काम करणारे कामगार पुराच्या वेढ्यामध्ये अडकले आहेत. त्यांनी एका पाण्याच्या टाकीचा आसरा घेतला होता. त्यांना आता सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, जमीन खरडल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

लोणारी नदीला पूर, संपर्क तुटला

लोणारी नदीला पूर आला असल्याने व पर्यायी रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने लहान,आंबेगाव,पाटनुर,चाभरा,तर बेलसर येथील कामामुळे शेतात पाणी शिरले आहे. नदी काठीवरील गावातील अनेक शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर शेलगाव, बामणी, अर्धापुर-कोंढा, गणपूर मार्ग आदी गावांचा संपर्क तुटला आहे.

तालुक्यात १४४ मि.लि पाऊस; जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल

तालुक्यात मॅन्युअल मोजणी प्रमाणे अंदाजे १४४ मि.लि पावसाची नोंद झाली आहे तर तालुक्यात आतापर्यंत ३६२ मिमि पावसाची नोंद झाली आहे. सदर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अर्धापूर तहसील, पंचायत समिती, कृषी विभाग, पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. यावेळी तहसीलदार उज्वला पांगरकर, नायब तहसीलदार मारोतराव जगताप, गटविकास अधिकारी मीना रावताळे, पोनी अशोक जाधव, पोउनि कपील आगलावे, पोउनि बळीराम राठोड, मंडळ अधिकारी संजय खिलारे, प्रफुल्ल खंडागळे, तलाठी रमेश गिरी यांच्यासह काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजीराव गव्हाणे, मेढला येथील सरपंच प्रतिनिधी दत्ता नवले, प्रहारचे तालुकाध्यक्ष छगन सांगोळे, भाजयुमोचे जठन पाटील मुळे, शेतकरी सेनेचे रमेश क्षीरसागर आदी उपस्थित आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,797FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!