Friday, December 6, 2024

नांदेड जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी वारे व गारपीट सुरूच; रात्री वीज पडून दोन जण ठार, इस्लापुरात गंजीला आग, पिकांचे मोठे नुकसान

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– जिल्ह्याच्या आज सलग तिसऱ्या दिवशी विविध भागात गारपीट व अतिवृष्टी झाली. तर काही भागात वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. गुरुवार दि. २७ एप्रिल रोजी दुपारी जिल्ह्यात काही भागात पुन्हा गारपीटी आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काल रात्री शहराच्या इस्लामपुरा आणि तुप्पा शिवारात वीज पडल्याने दोघांचा मृत्यू झाला.

नांदेड शहर व जिल्ह्यात गुरुवारी तिसऱ्या दिवशीही दुपारनंतर अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. विशेष करून मुखेड तालुक्यात गारपीट झाली. शहर व परिसरात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच काही भागात वीज पडून जीवितहानी झाली आहे. बुधवारी रात्री शहराच्या इस्लामपुरा फ्रुट मार्केट परिसरात वीज पडल्याने शेख वजीर शेख चांद (वय ४२) आणि जवाहरनगर तुप्पा येथे राहणारा हिमाचल प्रदेशचा तारासिंग बाबुराम चव्हाण यांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांची नोंद नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. आज तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील काही भागाला अवकाळीने झोडपले.

आज गुरुवार दि.२७ रोजी  मुखेड तालुक्यातील दापका राजा, सावरगाव पिरजादा, लादगा, जांब परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हैराण व हवालदिल झाला आहे.

इस्लापूर (ता. किनवट)- काल बुधवार, दि. २६ रोजी इस्लापूरसह परिसराला अवकाळी पावसाने झोडपले. मुरझळा येथे वीज पडून कडब्याची गंजी भस्मसात झाली. इस्लापूरसह परिसरात दिनांक २५ रोजी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले, तर मुरझळा येथील शेतकरी पंडित चव्हाण यांच्या शेतात वैरणाच्या गंजीवर वीज पडल्याने गंजीला आग लागून वैरण जळून खाक झाले तर त्याच्या जवळ ठेवलेले पाईप सुद्धा जळाले. यात चव्हाण यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून पीडित शेतकरी पंडित चव्हाण यांनी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार मृणाल जाधव यांच्या आदेशानुसार तलाठी सुदर्शन बुरकुले, केशव थळंगे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. निसर्गाच्या या लहरीपणामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला असून इस्लापूरसह कोसमेट, वाळकी, कुपटी, शिवणी, आप्पारावपेठ, परोटी रोडानाईकतांडा, मलकजाम, कंचली, आंदबोरी, गोंडजेवली, कोल्हारी, मुरझळा, पांगरी या गावांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अर्धापूर तालुका
अर्धापूर- परवा दि. २५ रोजी अवकाळीने अर्धापुर तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले. गारपीटीच्या तडाख्याने केळीसह पपईच्या,आंबाच्या बागा उध्वस्त झाल्या. तालुक्यातील अनेक भागात मंगळवारी, दुपारी गारांसह अवकाळी पाऊस झाला होता. पावसामुळे हळद, केळी, पपई व इतर पिकांचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर अनेक घरांची पत्रे उडाली, भिंती कोसळल्या पण सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. अशी माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.

हवामान विभागाने गारपिटीच्या शक्यतेचा अंदाज वर्तविला होता. तालुक्यात गारपीट व वादळी वाऱ्याने शेतीला मोठा फटका बसला असुन तालुक्यातील दाभड, मालेगाव, अर्धापूर या तीनही मंडळातील काही गावात गारपीट झाली आहे. यामध्ये दाभड, बामणी, शेलगाव, जांभरून, सावरगाव, पिंपळगाव, कलगाव, येळेगाव, पार्डी म., निमगाव,चोरंबा, गणपूर, कामठा, उमरी, सावरगाव आदी गावांना फटका बसला आहे.

यामध्ये प्रामुख्याने वाळणीसाठी व शिजवणी सुरू असलेल्या हळद पिकाचे नुकसान झाले आहे. उभे असलेले ज्वारीचे पीक, आंबा, भाजीपाला, फुलशेती आदी पिकाचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील कोंढा, कामठा, गणपुर, पिंपळगाव, बामणी, देळूब, सावरगाव, पार्डी, हिवरा आदी ठिकाणी केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे या भागातील केळी व पपईची झाडे मोडून, उन्मळून पडली. हाती आलेल्या पिकांचे डोळ्यांसमोर नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. दरम्यान, वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे पपई – केळीची पानेही फाटून गेली. झाडे तुटून पडल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

अचानक पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी हळद वाळायला ठेवली होती. दरम्यान, अवकाळी पावसाने हजेरी लावताच हळद भीजून गेली आहे. पावसासोबत वादळवारे जोराचे होते. तालुक्यातील अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाला. कोंढा येथील शंकरराव कदम यांची गट नं.३७ मध्ये दीड एकर तैवान पपई असून पंधरा दिवसात काढणीला आलेल्या पिकाचे अंदाजे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. बामणी येथील शेतकरी शंकर देविदास कदम यांच्या शेतामध्ये गाराच्या माराने बैलाची प्रकृती चिंताजनक आहे.

घरावरील पत्रे उडाली चिमुकली झाली जखमी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अर्धापूर तालुक्यातील भोगाव येथे अनेक घरावरील पत्रे उडून गेली, डोक्यात दगड पडल्यामुळे पंधरा वर्षांची मुलगी जखमी झाली आहे. देळूब येथील शेतकरी नारायण सोनवणे यांच्या शेतीतील वादळी वाऱ्यासह पाऊस गारपिटीने केळी,आंबा,पपई,सौर ऊर्जेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने त्वरित पंचनामे करावी अशी मागणी शेतक-याकडून होत आहे. शंकर राजाराम गाडे यांच्या शेतातील वादळामुळे लिंबाचे झाड अंगावर पडल्याने म्हैस दगावली असून यात मोठी आर्थिक हानी झाली आहे. अर्धापूर तालुक्यातील वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीटग्रस्त भागातील शेतीचे पंचनामे करून सेतक-यांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संतोष कल्याणकर यांनी शासनाकडे केली आहे.

किनवट तालुका
किनवट – तालुक्यात अवकाळी पावसाने मंगळवारी दि.२५ दुपारी शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी प्रचंड वादळवाऱ्यासह विजांच्या कडकडाटात तब्बल पाऊणतास मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.

तालुक्यात गेल्या महिनाभरापासून अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. अति पावसाने खरिपाची पिके हातून गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या अपेक्षा रब्बीवर होत्या. रब्बीचा हंगाम सुरू असतानाच तालुक्यात अवकाळी पाऊस, गारपिटीची मालिका सुरु झाली. यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. अधूनमधून पडणाऱ्या अवकाळी पावसाचा तडाखा गहू, हरभऱ्याच्या पिकांसह फळबागा, भाजीपाला व आंब्याला बसला. मंगळवारी दुपारी १ नंतर वातावरणात बदल होत वादळवाऱ्याला सुरुवात झाली होती. सोसाट्याच्या वाऱ्यात, विजांच्या प्रचंड कडकडाटात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. वादळवाऱ्यामुळे अनेक घरं, दुकानांवरील टीनपत्रे उडाले. शहरातील पोस्ट ऑफिस मार्ग व इतरत्र रस्त्यांवरील झाडं कोसळल्याने दुपारपासून विद्युत पुरवठा खंडित झाला होता. पालिका प्रशासनाच्या निष्काळजीमुळे शहराच्या वेलमापुरा भागातील हनुमान मंदिरात गटारातील घाण पाणी कचऱ्यासह मंदिरात शिरले होते. याबद्दल नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. किनवट तालुक्यातील विविध गावांत अवकाळी पाऊस, वादळवाऱ्यामुळे पिके, फळबाग, भाजीपाल्यासह आंब्याचे मोठे नुकसान झाले. वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात कैऱ्या पडल्यामुळे बाजारात कैरीचे दर निम्म्यावर आले आहेत. प्रशासनाने नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांतून होत आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!