Wednesday, July 24, 2024

नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम अशा विविध जिल्ह्यात पेट्रोल पंप लुटणाऱ्या टोळीला अर्धापूर पोलिसांनी पकडले

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम या मराठवाडा- विदर्भातील विविध जिल्ह्यात पेट्रोल पंप लूटणाऱ्या टोळीला अर्धापूर पोलिसांनी पकडले आहे.

दिनांक 14 मार्च रोजी पद्मावती पेट्रोल पंपाचे मॅनेजर दादाराव अशोक हाके (रा. नांदेड) हे पेट्रोल पंपावर जमा झालेली चार दिवसांची नऊ लाख 54 हजार 220 रुपये रक्कम बॅगमध्ये टाकुन सकाळी दहा वाजता मालेगांव येथील बँकेत जमा करण्यासाठी मोटार सायकलवर जात होते. धामदरी पाटीजवळ त्याचे पाठीमागुन एका पल्सर मोटार सायकलवर तिघे जण तोंडाला कपडा बांधलेले अज्ञात चोरटे आले. त्यांनी दादाराव हाके यांचे मोटार सायकलला पाठीमागुन लाथ मारुन त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला व त्याचे जवळ असलेली पेट्रोल पंपाचे 9 लाख 54 हजार 220 रुपये जबरीने चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलीस स्टेशन अर्धापूर येथे गुन्हा कलम 393 भारतीय दंड संहिताप्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक विजय कबाडे व उपविभागीय पोलिस अधिकारी अर्चना पाटील यांनी सदर गुन्हयात आरोपी शोध घेण्यासाठी मार्गदर्शन करुन सुचना दिल्या. त्यावरुन पोलीस स्टेशन अर्धापूरचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी तत्परतेने घटनास्थळाला भेटी देऊन गोपनिय माहिती एकत्रित केली. त्यानंतर गुप्त बातमीदार नेमुन उपलब्ध खात्रीशिर माहितीचे आधारे दिनांक 30 मार्च रोजी माहिती घेतली असता सदर आरोपी हे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात करंजी येथे असल्याची खात्रीशिर माहिती त्यांना मिळाली. त्यावरुन पोलीस स्टेशनचे दोन वेगवेगळे पथक तयार करुन पोलीस स्टेशन अर्धापूर येथील पोलीस निरीक्षक अशोक जाधव, पोलीस उप निरीक्षक कपिल आगलावे, पोलीस उप निरीक्षक, साईनाथ सुरवसे, पोलीस नाईक राजेश घुन्नर, पोलीस नाईक संजय घोरपडे, होमगार्ड-दिपक बल्लोंड, होमगार्ड-सर्जेराव मुंगल हे सर्वजण त्या ठिकाणी गेले असता आरोपी हे पोलिसांना पाहून पळ काढत होते. त्यांचा पाठलाग करुन पाच आरोपींना ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली. तेव्हा संशयीत इसम सर्जेराव रोहिदास होळपदे (वय 22) वर्ष रा. करंजी ता. वसमत, देवानंद ऊर्फ लखन बालाजी दुधमागरे (वय 21) रा. खांडेगांव ता. वसमत, पवन माणिकराव डाकोरे (वय 21) रा. पळसगांव ता वसमत, गोविंद ऊर्फ अतुल रमेश तुरेराव (वय 23) रा. खांडेगांव, राजु एकनाथ चव्हाण रा. खांडेगांव ता. वसमत हे मिळुन आले.

या संशयितांना ताब्यात घेवून त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी मालेगांव ते वसमत रोडवर पद्मावती पेट्रोल पंपाचे 9,54,220/- रुपये जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे कबूल केले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटार सायकली जप्त करण्यात आल्या.

यानंतर पोलिसांनी या आरोपीतांना अधिक विचारपुस केली असता, त्यांनी पोलीस स्टेशन लिंबगांव हद्दीतील निळा येथील वैशालीताई पावडे यांच्या पेट्रोल पंपावर जबरी चोरी केल्याचे कबूल केले. तसेच पोलीस स्टेशन आसेगांव जि. वाशिम हद्दीतील बिटोळा भोयर येथील आंनदी ह्या पेट्रोल पंपावर जबरी चोरी,   पोलीस स्टेशन मानवत हद्दीतील रूद्री पाटीजवळ कैलास या पेट्रोल पंपावर जबरी चोरी, महागांव हद्दीतील पेट्रोल पंपावर जबरी चोरी केल्याचे कबूल केले. यामुळे विविध जिल्ह्यात घडलेल्या पेट्रोल पंपावरील लुटीच्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.

सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक जाधव, पोलीस उप निरीक्षक कपिल आगलावे, पोलीस उप निरीक्षक, साईनाथ सुरवसे, पोलीस नाईक राजेश घुत्रर, पोलीस नाईक संजय घोरपडे, होमगार्ड-दिपक बल्लोड, होमगार्ड-सर्जेराव मुंगल यांनी पार पाडली.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!