ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- शहर स्वच्छ व सुंदर रहावे यासाठी नांदेड महापालिकेच्यावतीने सर्वसामान्यांच्या नजरेत भरावा असा उपक्रम महापालिकेच्या वतीने सध्या राबविण्यात येत आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरील भिंतीवर सुविचार, चित्र रेखाटणे, पर्यावरणाचा संदेश आदी बाबी रंगविण्यात येत असल्याने भिंती बोलक्या झाल्या आहेत. यापूर्वी असा उपक्रम नांदेड दक्षिणचे तत्कालीन आमदार आणि विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी राबविला होता.
सध्या नांदेड शहरात महापालिकेतंर्गत असलेल्या रस्त्यालगतच्या भिंती समाज जागृती करणाऱ्या घोषवाक्याने रंगविल्या जात आहेत. सर्वात प्रथम ही संकल्पना खा. हेमंत पाटील यांनी नांदेड दक्षिणचे आमदार असताना साकारली होती. त्यानंतर महापालिकेतील उपायुक्त शुभम क्यातमवार यांनी नवीन निर्णय घेत महापालिकेअंतर्गत असलेल्या रस्त्यालगतच्या भिंती रंगवत शहराच्या सौंदर्यात भर टाकण्याचा निर्णय घेतला असून या भिंती रंगविण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
शहराच्या सौंदर्यात भर घालणारे उपयुक्त गोष्टी कराव्यात यासाठी क्यातमवार यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. कोविडच्या पहिल्या लाटेत त्यांनी केलेल्या कामाची चर्चा सर्वत्र झाली होती. त्यानंतर आता त्यांनी शहरात लोकसहभागातून महापालिकेच्यावतीने शहरातील भिंती रंगवून नांदेडच्या सौंदर्यात भर टाकणारा उपक्रम सुरू केला आहे. क्यातमवार यांनी शहरातील प्रसिध्द आयआयबी क्लासेसची यासाठी मदत घेतली आहे.
नांदेड महापालिकेने सुरु केलेल्या या लोकसहभागातून नाविन्यपूर्ण उपक्रमातून शहराचे सौंदर्यीकरण वाढलेच आहे. त्यामुळे माझे शहर सुंदर शहर ही संकल्पनाही प्रभावीपणे राबविली जात आहे. मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली क्यातमवार यांनी पुढाकार घेत हा उपक्रम सुरू केला आहे. शहरात अनेक चौक गुरु- ता- गद्दी सोहळ्यानिमित्त साकारण्यात आले, त्याला आज एक तप पूर्ण झाले आहे. त्या चौकांचेही लवकरच सुशोभीकरण होईल अशी अपेक्षा यामुळे बळावली आहे. यासाठी एनजीओ अथवा मोठ्या संस्थांनी सहभाग घेतल्यास निश्चीतच महापालिका त्यांना सहकार्य करेल अशी ग्वाही क्यातमवार यांनी दिली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
