Sunday, October 6, 2024

नांदेड शहरात बॅनर, होर्डिंग्ज लावणार्‍यांवर होणार गुन्हे दाखल; शहर विद्रूपीकरण रोखण्यासाठी महानगरपालिकेचा निर्णय

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहराचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी आणि होणारे विद्रूपीकरण रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने कठोर निर्णय घेतला असून यापुढे शहरात सण, उत्सव आणि महापुरुषांची जयंती वगळता अन्य कारणासाठी बॅनर, होर्डिंग्ज लावल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने महानगरपालिकेने आज झालेल्या बैठकीत या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश पारीत केले आहेत.

महापौर सौ जयश्री निलेश पावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस उपमहापौर अब्दुल गफार, स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी, सभापती सौ अपर्णा नेरलकर, अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम ,उपायुक्त निलेश सुंकावार, नगरसेवक बालाजी जाधव, अमित शहा, दीपक पाटील यांच्यासह महानगरपालिका क्षेत्रातील सर्व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

नांदेड शहरातील अनेक भागात विनापरवाना सण, उत्सव व महापुरुषांची जयंती वगळता ही मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात येते. या बॅनरबाजीमुळे शहराचे  विद्रुपीकरण होते आहे . हे विद्रूपीकरण रोखण्यासाठी आणि मुख्य रस्त्यावरील किरकोळ अपघात रोखण्यासाठी 8 ऑगस्ट 2011 रोजी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक 74 नुसार शहरातील बॅनर लावण्यावर बंदी घालण्यात आली होती. राष्ट्रपुरुषांची जयंती आणि सण-उत्सव वगळता अन्य कारणांसाठी बॅनर लावणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही त्या ठरावानुसार देण्यात आले होते . आता याच ठरावानुसार कारवाई करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.

गणराज्य दिन, नवीन वर्ष ,छत्रपती शिवाजी महाराज जयंती, श्री गुरू गोविंदसिंगजी जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन, स्वातंत्र्य दिन, अण्णाभाऊ साठे जयंती, रमजान ईद ,गणेश उत्सव ( पहिले तीन दिवस ), विजयादशमी, दीपावली ,महात्मा फुले जयंती, डॉ. शंकरराव चव्हाण जयंती, नाताळ सण वगळता अन्य कोणत्याही कारणासाठी बॅनरबाजी केल्यास कायदेशीर कारवाई करण्याच्या अनुषंगाने संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निर्देशित करण्यात आले आहे.

यासाठी आज पार पडलेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे यापुढे शहरात अवैध बॅनरबाजी करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे . प्रासंगिक किंवा तात्पुरत्या स्वरूपाच्या जाहिराती परवाना घेऊन लावण्याच्या अनुषंगानेही नियमावली तयार करण्यात आली असल्याची माहिती महापौर सौ जयश्री निलेश पावडे यांनी दिली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!