ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड – दोन दिवसांपूर्वी हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार नांदेड शहर व परिसरात आज रविवार दि. १२ रोजी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस बरसला. या पावसाने शहरभरात तुंबलेल्या नाल्यांमुळे शहराच्या विविध भागांतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यावेळी काही भागात गारपिटही झाली असून वादळी वाऱ्यामुळे नांदेड शहराचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. तसेच काही भागात रस्त्यावर झाडे कोलमडली आहेत.
हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केला होता. त्यानुसार दुपारी अचानक आकाशात ढग भरून आले. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. काही भागात गारपिटही झाली. नांदेड शहरासह सिडको, हडको, सांगवी, तरोडा, कौठा, असर्जन, विष्णुपुरी, बळीरामपूर, वाजेगाव, बोंढार, मरळक, बारड, वाडी, पिंपळगाव, गाडेगाव, कामठा, पासदगाव या शहराच्या आजूबाजूच्या परिसरात तब्बल दोन तास जोरदार पाऊस झाला. यामुळे लहान मोठ्या नाल्यांना पूर आला आहे. वादळी वाऱ्यामुळे महावितरण प्रचंड नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. काही भागात विजेचे खांब कोलमडून पडले तर काही ठिकाणी तारा तुटल्या. परिणामस्वरूप शहर व परिसरातील वीज पुरवठा बंद पडला.
सध्या सफाई अभावी शहराच्या अनेक भागातील नाल्या तुंबलेल्या आहेत. या पावसाने शहरभरात तुंबलेल्या या नाल्यांमुळे शहराच्या विविध भागांतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यात अनेक वाहने फसली. रविवार जुना मोंढा, इतवारा परिसरात आठवडी बाजार असल्याने बाजारासाठी आलेल्या दुकानदारांची आणि ग्राहकांची एकच तारांबळ उडाली. तर काही भागात गृहिणींनी कडक उन्हाळ्यामुळे खारोड्या, कुरोड्या, पापड, शेवया आदी पदार्थ तयार करून वाळू घातले होते. त्या गृहिणींचीही एकच तारांबळ उडाली.
नवीन मोंढा भागात आडत दुकानदाराची ही दाणादाण उडाली. दुकानासमोर पडलेले हळदीचे ढीग उचलून दुकानात टाकण्याची एकच धावपळ होती. शहरातील सकल भागात पाणी साचले. घाण पाणी रस्त्यावर साचल्याने वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती. एकंदरीत जोरदार पावसामुळे नांदेडकरांची दाणादाण उडाली. या पावसामुळे प्रचंड तापमानापासून व उकाड्यापासून नांदेडकरांना काहीसा दिलासा मिळाला.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻