Sunday, October 6, 2024

नांदेड सायबर पोलिसांमुळे युवकास जिंकलेले 69 लाख रुपये मिळाले परत; क्रिकेटची टीम बनवून जिंकले होते एक कोटीचे बक्षीस

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ Dream-11 App द्वारे मिळालेल्या बक्षिसाची रक्कम गुन्हेगाराच्या तावडीतून मिळाली परत

नांदेड- येथील एका युवकाने ‘Dream-11 App’ च्या माध्यमातून क्रिकेटची टीम बनवून त्याद्वारे एक कोटीचे बक्षीस जिंकले आहे. मात्र बक्षिसाची ही रक्कम या युवकाच्या खात्यात जमा होण्यापूर्वीच ऑनलाईन फ्रॉड करून ही रक्कम हडप करण्याचा प्रयत्न ऑनलाईन घोटाळेबाजांनी केला. मात्र नांदेडच्या सायबर सेल पोलिसांनी हा डाव उधळून लावला असून नांदेडच्या युवकास बक्षिसाचे एकूण 70 लाख रुपये मिळाले आहेत.

येथील एका युवकाने दि. 10 मे 2021 रोजी IPL मधील गुजरात टायटन विरुध्द लखनऊ सुपर जॉयंटस या मॅचचे वेळी Dream 11 Team App वर स्वत:ची टीम लावली होती. त्या युवकाची टीम Dream 11 App वर पहिल्या क्रमांकावर आली. त्यामुळे या युवकास Dream 11 Team कडून एक कोटी रूपयाचे बक्षिस मिळाले. या बक्षिसावर 30% Tax कपात करून त्या कंपनीने उर्वरीत 70 लाख रुपये या युवकाच्या Dream 11 अकाऊंटवर जमा केले होते.

या रक्कमेतून बक्षीस विजेत्या युवकाने एक लाख रूपये बक्षिसाच्या अकाऊंटवरून स्वतःच्या वैयक्तिक बँक अकाऊंटवर जमा केले होते. त्यानंतर उर्वरीत 69 लाख रुपयेही तो बँक खात्यात जमा करत असताना, ही बाब ऑनलाईन घोटाळे करणाऱ्या गॅंगनी तात्काळ हेरली. अज्ञात सायबर गुन्हेगाराने बक्षिस मिळालेल्या युवकास कॉल करून ‘Dream 11 Team’ कंपनीकडून बोलत असल्याचे सांगितले. तुम्हाला जे एक कोटी रूपयाचे बक्षिस लागले आहे, त्या संदर्भात कागदपत्रे पडताळणी करायची आहे; असे म्हणून त्या व्यक्तीकडून मेलवर आलेला OTP घेवून त्याच्या Dream 11 Team App वरील मेल आयडीमध्ये बदल केला.

याच दरम्यान, बक्षीस विजेता युवक जिंकलेले पैसे बँक अकाउंटवर ट्रान्सफर करण्याचे प्रयत्न करत होता. पण हे पैसे ट्रान्सफर होत नसल्याने या युवकाने नांदेड सायबर सेलकडे तात्काळ तक्रार केली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे व विजय कबाडे यांचे मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे, पोलीस उप निरीक्षक गजानन दळवी, सोपान थोरवे व पोलीस अंमलदार विलास राठोड, मोहन स्वामी यांनी Dream 11 Team कंपनीला तात्काळ ई-मेल व फोन कॉलद्वारे सदर विजेत्या युवकाने जिंकलेले पैसे तात्काळ फ्रिज करण्यास (रोखण्यास) सांगितले. त्याचबरोबर पोलिसांनी विजेत्या युवकास मुंबई येथील Dream 11 Team च्या ऑफीसला जावुन भेटण्यास सांगितले.

त्यानंतर सायबर गुन्हेगाराने सदर युवकाच्या मेलमध्ये केलेले बदल व सायबर शाखा नांदेड येथून करण्यात आलेले ई-मेल यावरून सदर व्यक्तीचे Dream 11 Team खाते सस्पेंड करण्यात आले व रक्कम फ्रीज करण्यात आली. सायबर शाखेच्या सुचनेनुसार सदर व्यक्ती मुंबईला संबंधीत Dream 11 ऑफीसला गेल्यावर, Dream 11 Team कंपनीने नांदेडच्या सायबर सेलकडून आलेल्या मेलनुसार त्याची खात्री करून विजेत्या युवकास त्याची रक्कम रू. 69 लाख त्याचे बँक खात्यात जमा करून देण्यात आली.

नांदेड सायबर सेलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही केल्याने त्या युवकाचे Dream 11 Team द्वारे जिंकलेले रू. 69 लाख परत मिळाले आहेत. या युवक नांदेडच्या तरोडा भागातील रहिवासी आहे. सुरक्षेच्या कारणावरून त्याचे नाव जाहीर करणे टाळण्यात येत आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!