ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे विरोधी दोन नेते उद्या नांदेड जिल्ह्यात प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर येत आहेत. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह विविध पक्षातील मातब्बर राजकीय नेत्यांनी उपस्थिती असणार आहे. माजी राज्यमंत्री स्व. गंगाधरराव देशमुख कुंटूरकर स्मृती समारोहाच्या निमित्ताने हे सर्व नेते एकत्र येत असून या कार्यक्रमात रंगणाऱ्या कलगीतुऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्या रविवारी माजी राज्यमंत्री स्व. गंगाधरराव कुंटूरकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा आणि ‘धुरंधर’ या स्मृतिग्रंथ प्रकाशनाचा सोहळा होत आहे. या कार्यक्रमास सर्व नेते उपस्थित राहत आहेत. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले पालकमंत्री अशोकराव चव्हाण आणि खा.प्रतापराव पाटील चिखलीकर हेही मोठ्या काळानंतर एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत.
फडणवीस पुन्हा खा. चिखलीकरांकडे मुक्कामी
देवेंद्र फडणवीस नागपूर-यवतमाळ मार्गे मोटारीने अर्धापूर व त्यानंतर आज रात्री नांदेड येथे मुक्कामी येत आहेत. यावेळीही ते खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वसंतनगर येथील ‘साईसुभाष’ निवासस्थानीच मुक्काम करणार आहेत. मागच्या दौऱ्यातही ते खा. चिखलीकर यांच्या निवासस्थानीच मुक्कामी होते.
गंगाधर जोशी, प्रवीण साले, महेश खोमणे, चैतन्यबापू देशमुख यांच्या निवासस्थानी भेट
उद्या दि. 3 एप्रिल रोजी सकाळी फडणवीस भाजप पदाधिकार्यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर नांदेड जिल्हा भाजपाचे संघटक सचिव गंगाधरराव जोशी यांची भेट घेतील. बी.के.हॉल, श्रीनगर येथील निवासस्थानी जाऊन जोशी कुटूंबियांचे सांत्वन करणार आहेत. गंगाधरराव जोशी यांच्या पत्नीचे नुकतेच पुणे येथे निधन झाले होते. त्यानंतर सकाळी 8.45 वाजता भाजपाचे महानगराध्यक्ष प्रविण साले यांच्या भाग्यनगर येथील निवासस्थानास फडणवीस सदिच्छा भेट देणार आहेत. त्यानंतर भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश उर्फ बाळू खोमणे यांच्या सराफा होळी येथील निवासस्थानी जावून खोमणे कुटूंबियांचेही सांत्वन करणार आहेत. बाळू खोमणे यांचे वडील मंचकराव खोमणे यांचे नुकतेच निधन झाले आहे. खोमणे कुटूंबियांचे सांत्वन केल्यानंतर भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य चैतन्यबापू देशमुख यांच्या होळी येथील निवासस्थानास सकाळी 9.30 वाजता सदिच्छा भेट देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस कुंटूरकरडे रवाना होणार आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻