Friday, December 6, 2024

‘नीट’च्या पेपरची 40 ते 50 लाखांत विक्री?; लातूरचे 2 शिक्षक आणि नांदेडच्या एकासह चौघांविरुध्द गुन्हा दाखल, नांदेड एटीएसची कारवाई

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

•नवीन कायद्यानुसार गुन्हा दाखल

•आरोपी खासगी कोचिंग क्लासेसचे चालक

नांदेड/ लातूर : एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘नीट’ परिक्षेचे पेपर तब्बल 40 ते 50 लाख रुपयांत विक्री करण्यात आल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात उघड झाल्याचे समजते. यात लातूरसह, नांदेड तसेच दिल्लीतील लोकांचे रॅकेट काम करत होते, हे तपासात पुढे आले असून याप्रकरणी लातूरचे 2 शिक्षक आणि नांदेडच्या एकासह चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड एटीएसच्या तपासानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. यात एक शिक्षक फरार झाला असल्याचे सांगण्यात येते. दोन्ही शिक्षक लातूरमध्ये खासगी कोचिंग क्लासेसचे चालकही आहेत.

या पेपरफुटी प्रकरणात लातुरातील दोन जिल्हा परिषद शिक्षक तसेच मुळ देगलूर (जि. नांदेड) आणि दिल्लीतील एक अशा चौघांविरूद्ध लातूरच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक शिक्षक हा लातूर तर दूसरा हा सोलापूर येथे काम करतो. दोघेही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे. संजय जाधव मूळ बोथी तांडा (ता. चाकूर) येथील असून सोलापूरच्या टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत आहे. तर लातूरच्या अंबाजोगाई रोड येथील रहिवाशी जलील उमरखाँ पठाण लातूर येथील कातपूर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे. हे दोघेही लातूर येथे खाजगी कोचिंग क्लासेस चालवत होते.

वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या या परीक्षेसाठी देशभरातील मुले तयारी करत असतात. नांदेड, लातूर येथे नीट व जेईईची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत लक्षणीय आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खासगी कोचिंग क्लासेसची संख्या या ठिकाणी वाढतच आहे. याच दृष्टीने एटीएसचे पथकाने तपास सुरू केल्यानंतर ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

लातूर, नांदेडमध्ये रॅकेट
पेपरफुटीच्या प्रकरणात एटीएस अर्थात दहशतवाद विरोधी पथकाचे पाेलीस उपनिरीक्षक आवेझ काझी यांच्या फिर्यादीवरुन संजय तुकाराम जाधव (वय ४०, रा. लातूर), जलीलखाॅ उमरखान पठाण (वय ३४, रा. लातूर), ईरन्ना मष्णाजी काेनगलवार (मुळ रा. देगलूर जि. नांदेड ह.मु. आयटीआय उमरगा जि. धाराशिव) आणि गंगाधर मुंडे (रा. सध्या दिल्ली) या चाैघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्र सरकारने नव्याने केलेल्या पेपरफुटीच्या कायद्यानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हा दाखल
संजय तुकाराम जाधव, जलिलखाॅ उमरखान पठाण हे दाेघे पैसे घेऊन परीक्षा उत्तीर्ण करण्याचे रॅकेट चालवित असल्याची माहिती पाेलिस उपनिरीक्षक आवेझ काझी यांना कळली. त्यावरुन एटीएसचे पाेलीस निरीक्षक सुनील नाईक हे तपासासाठी त्यांच्या पथकासह लातुरात दाखल झाले. त्यांनी लातुरातील दोन शिक्षकांना ताब्यात घेऊन त्यांची प्राथमिक चाैकशी केली. या दोन्ही शिक्षकांच्या माेबाईलवरील माहिती, फाेन गॅलरीमधील परिक्षार्थ्यांचे प्रवेशपत्र, व्हाॅटस्अप चॅटिंगबाबत आदी अनेक संशयास्पद बाबी आढळल्या. त्यामध्ये जलिलखाॅ पठाण याने संजय जाधव यास प्रवेश पत्राच्या प्रति आणि आर्थिक व्यवहारासंदर्भात मेसेजेस् पाठविल्याचे आढळून आले. तसेच जाधव याने अन्य एक संशयीत नांदेड जिल्ह्यातील देगलूरचा ईरन्ना मष्णाजी काेनगलवार यास विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे व्हाॅटस्अपद्वारे पाठविले. पुढे ईरन्ना काेनगलवार याने दिल्लीतील गंगाधर नावाच्या व्यक्तीला संपर्क केला. जाे पैशाच्या माेबदल्यात नीट परीक्षेत गैरव्यवहार करीत असल्याचा संशय असल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले असून तशी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तपास सीबीआयकडे
दि. 5 जून रोजी नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला. तेव्हापासून या परीक्षेबाबत गदारोळ निर्माण झाला आहे. मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर शनिवार, दि.२२ रोजी केंद्र सरकारने या प्रकरणी सर्वसमावेशक तपास करण्यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले आहे. केंद्र सरकारकडून युजीसी नेट आणि नीट परीक्षा अशा दोन्ही परीक्षांमधील अनियमिततेची चौकशी करण्याची जबाबदारी सीबीआयकडे सोपवली आहे.

नीट-पीजी प्रवेश परीक्षा पुढे ढकलली
देशभरात नीट-पीजी प्रवेश परीक्षा रविवारी (दि. २३) घेण्यात येणार होती. मात्र, आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. तसेच या परीक्षांबाबतच्या तारखांची माहिती लवकरच जाहीर केली जाईल, असेही सांगण्यात आले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले की, ”काही स्पर्धा परीक्षांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. या घटनांची गंभीर दखल घेत आरोग्य मंत्रालयाकडून प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. मेडिकलसाठी राष्ट्रीय परीक्षा बोर्डाकडून आयोजित एनईईटी-पीजी प्रवेश परीक्षा प्रक्रियेचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला गेला. आता या परीक्षांच्या नव्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.”

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!