Saturday, July 27, 2024

नुपूर शर्मांच्या वक्तव्याचे ग्रामीण भागातही पडसाद, हदगावमध्ये काढण्यात आला मोर्चा; अटकेची मागणी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने मुस्लिम समाजाच्या वतीने मोर्चा

हदगाव (जि. नांदेड)- भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मां त्याचबरोबर नवीन जिंदाल यांच्या वक्तव्याचे आता ग्रामीण भागातही पडसाद उमटत आहेत. नांदेड जिल्ह्यातील हदगावमध्ये त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. तसेच त्यांच्या अटकेची मागणी करण्यात आली.

भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल आज दि. 9 जून रोजी हदगाव आझाद चौक येथून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी तहसीलदार जीवराज डापकर व पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांना निवेदन दिले.

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. त्यांना देशासह परदेशातूनही जाहीर निषेध होत आहे. तसेच नवीन जिंदल यांचा सुद्धा निषेध होत आहे. याचे पडसाद आता ग्रामीण भागातही उमटत असल्याचे हदगावमधील मोर्चावरून दिसून येत आहे.

हदगावमध्ये मुस्लिम बांधवांच्यावतीने बंदची हाक देण्यात आली होती. या बंदमध्ये सर्व मुस्लिम बांधवांनी आपापली दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला. आझाद चौक, पोलीस स्टेशन रोड, राठी चौक, आंबेडकर चौक ते तहसील कार्यालयापर्यत मोर्चा काढण्यात आला. शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहून मुस्लीम समाजाने आपला रोष व्यक्त केला. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना तात्काळ अटक करा, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

अनेक ठिकाणी नुपूर शर्मा व नवीन जिंदल यांचे पोस्टर लावण्यात आले होते. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पोलिसात गुन्हा दाखल होऊन सुद्धा सरकारने नुपूर शर्माला अटक का करीत नाही, असा सवाल निवेदनात करण्यात आला आहे.

या घटनेचा निषेध म्हणून भिम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शळके व त्यांच्या संघटनेने या मोर्चाला पाठींबा दर्शविला होता. या मोर्चाला शहरातील सर्व मुस्लिम बांधव एम आय एम पक्ष व भिम टायगर सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इतर नागरिकांची उपस्थिती होती.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!