Sunday, October 6, 2024

परीक्षेसाठी जेलमधुन बाहेर आलेल्या कैद्याची चक्क पोलिसाला मारहाण; यशवंत कॉलेजसमोरील प्रकार, मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल 

नांदेड– परीक्षेसाठी जेलमधुन बाहेर आणण्यात आलेल्या कैद्याने चक्क पोलिसाला मारहाणकेल्याचा प्रकार आज नांदेड शहराच्या यशवंत कॉलेजसमोर घडला. हा मोक्काच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी असून या प्रकारानंतर त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील कारागृहात मोक्का अंतर्गत अटकेत असलेला आरोपी लक्ष्मण उर्फ लक्की मोरे हा मुक्त विद्यापीठाअंतर्गत पदवी परीक्षा देत आहे. आज परीक्षा देऊन केंद्राबाहेर येताच त्याने हातकडी लावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केली. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आज बुधवार दिनांक 31 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुदखेड तालुक्यातील निवघा येथील लक्ष्मण उर्फ लक्की बालाजी मोरे याच्यावर 2018 सालापासून विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध मुदखेड, बारड, भोकर, नांदेड येथील पोलीस ठाण्यात अग्निशस्त्र बाळगणे, दरोडा, खून, खुनाचा प्रयत्न, वाटमारी यासह विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध सध्या चार गुन्हे न्यायप्रविष्ठ असून ते तपासावर आहेत. लक्की मोरे हा संघटित गुन्हेगारी अंतर्गत नांदेड कारागृहात मागील काही दिवसांपासून स्थानबद्ध आहे.

मुक्त विद्यापीठ अंतर्गत पदवी परीक्षा देण्यासाठी त्याने न्यायालयाकडे विनंती केली आणि न्यायालयाने त्याला परीक्षा देण्याची संधी दिली. पोलीस बंदोबस्तात तो मागील दोन दिवसांपासून शहराच्या यशवंत महाविद्यालयात परीक्षा देत होता. आज दि. 31 मे रोजी परीक्षा देऊन परीक्षा केंद्राबाहेर येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन हातकडी लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने पोलिसांसोबत हुज्जत घालत चक्क पोलिसावर हल्ला चढवला. पोलीस मुख्यालयातील अंमलदार एस. आर. डोईबळे यांच्यावर हल्ला चढवत कॉलर पकडून मारहाण केली.

या प्रकारानंतर शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. ही माहिती मिळताच नुकतेच रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर) संजय गुरव यांनीही घटनास्थळाला भेट दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या आदेशावरून फौजदार आशिष बोराटे आणि त्यांचे पथकही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर केले.

लक्की मोरेविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसावर हल्ला करून तो पळून जाण्याच्या बेतात होता का? याचा तपास आता वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!