Thursday, September 19, 2024

पाणी भरणाऱ्या महिलेस वानराने विहिरीत ढकलले; किनवट तालुक्यातील धक्कादायक प्रकार, वानरांच्या उच्छादाने ग्रामस्थांमध्ये घबराट

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- विहिरीवर पाणी भरत असलेल्या महिलेला वानराने विहिरीत ढकलून दिल्याची धक्कादायक घटना किनवट तालुक्यातील नंदगाव येथे घडली आहे. या प्रकाराने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण असून वनविभागाने गावातील वानरांचा उच्छाद थांबविण्यात यावा अशी मागणी होत आहे.

काल सोमवारी किनवट तालुक्यातील नंदगाव येथे काही महिला विहिरीवर पाणी भरत होत्या. याचवेळी वानराच्या कळपातील एका वानराने एका महिलेसह पाठीमागून जोरात धक्का मारून तिला चक्क विहिरीत ढकलून दिले. या धक्कादायक प्रकाराने तिथे एकच गोंधळ उडाला. विहिरी शेजारी असलेल्या नागरिकांनी सतर्कता बाळगत या महिलेला विहिरीच्या बाहेर काढले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

वानराने विहिरीत ढकललेल्या महिलेचे नाव पल्लवी पंडित तांबारे असे आहे. त्या घरासमोर असलेल्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी पाठीमागून आलेल्या वानराने त्यांना धक्का दिल्याने त्या विहिरीत पडल्या. ही बाब नागरिकांना समजल्यानंतर त्यांनी विहिरीतून महिलेला बाहेर काढले. यामध्ये महिला किरकोळ जखमी झाली असून भयभीत झालेल्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

या गावात वानरांचा उच्छाद सुरू असून, या वानरांचा बंदोबस्त करावा याबाबत इस्लापूर वन विभागाला अनेक वेळा विनंती करण्यात आली. वानराचा बंदोबस्त करा असे ग्रामपंचायतचे ठरावही देण्यात आले आहेत. मात्र वनविभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी वानरांनी अनेकांना चावा घेऊन जखमीही केलेले आहे. वन विभागाने या वानरांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!