ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ खाकीतील माणुसकीचे सर्व स्तरातून कौतुक
नांदेड– कर्तव्य कठोर खात्यात काम करणाऱ्या खाकीतील एका अधिकाऱ्यामुळे हात गमावलेल्या व्यक्तीला जीवदान मिळाले. विशेष म्हणजे काही चूक नसताना एका व्यक्तीला गमावावा लागलेला हात पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार आणि पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड तसेच डॉ. देवेंद्र पालीवाल यांच्या प्रयत्नांमुळे परत मिळाला.
चिखली (ता. नांदेड) येथील मिस्त्री कामगार त्रिशरण कैलास थोरात (वय ३७) याचा दि. २० जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास नांदेड शहराच्या तरोडा नाका परिसरात दुचाकी मागेपुढे घेण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादात सुरज संजय बसवंते रा. पांडुरंगनगर, आकाश भागोराव रणमले (वय २०) रा. पांडुरंगनगर आणि विनय राम जाधव (वय १९, रा. नमस्कार चौक नांदेड) यांनी चक्क तलवारीने हल्ला करीत त्रिशरणच्या डाव्या हाताचा मनगटापासून अक्षरशः तुकडा पाडला. या खळबळजनक घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड हे घटनास्थळी धावले. आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्रिशरणचा तुटलेला हात एका पिशवीत घालून त्याला रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान यशोसाई हॉस्पिटलचे डॉ. देवेंद्र पालीवाल यांच्याशी पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी तात्काळ संपर्क साधला आणि डॉक्टरांनी आठ तास शस्त्रक्रिया करून त्रिशरणचा तुटलेला हात शस्त्रक्रिया करून पुन्हा जोडला आहे. यासाठी डॉ. पालीवाल यांचे कोकाटे यांनी जाहीर कौतुक केले आहे. तर तिकडे पोलिसांनी आरोपींना अटक केली. या गुन्ह्यातील आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक पेरेवार, कर्मचारी कदम, गर्दनमारेसह आदींचे पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻