Sunday, October 6, 2024

पार्टीसाठी गेलेल्या दोन बहिणींसह तिघींचा पैनगंगा नदीत बुडून मृत्यू; पोलिसांनी केली दोन तरुणांना अटक

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

किनवट (जि. नांदेड) : पैनगंगा नदीवर पार्टीसाठी गेलेल्या कुटुंबातील दोन बहिणींसह तिघींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना काल सोमवारी घडली. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी मयत ममताचा पती जावेद शेखसह दोन जणांना अटक केली आहे.

किनवट तालुक्यातील मारेगाव (खालचे) पैनगंगा नदीत दोन सख्ख्या बहिणीं आणि इतर एक युवती अशा तिघींच्या बुडून मरण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोन तरुणांना किनवट पोलिसांनी आज मंगळवार दि.२८ रोजी अटक केली. त्यांच्याविरुद्ध विविध कलमांसह अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ममता शेख जावेद (वय 21 वर्षे), पायल देविदास कांबळे (वय 16 वर्षे) आणि तिची बहीण स्वाती देविदास कांबळे (वय 12 वर्षे) अशी पैनगंगा नदीत बुडून मृत्यू झालेल्यांची नावं आहेत.

किनवट तालुक्याच्या मारेगाव (खा.) येथील देवीदास कांबळे यांच्या कुटुंबातील १० जण सोमवारी दुपारी मारेगावच्या पैनगंगा नदीकाठावर पार्टी करण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर देवीदास कांबळे यांचे जावई जावेद शेख व त्याचा साथीदार मिथून कुवर यांनी जावेद याची पत्नी ममता हिला पोहता येत नसल्याचे माहीत असूनही तिला नदीपात्रात उतरविले. ममता ही नदीत उतरल्याचे पाहून पायल व स्वाती देवीदास कांबळे या दोन बहिणीही पाण्यात उतरल्या.

यानंतर नदीत एकमेकांवर पाणी टाकत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तीनपैकी एक मुलगी पाण्यात बुडायला लागली; तिला इतर दोघींनी वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला, पण एकीला वाचविण्याच्या प्रयत्नात इतर दोघीही बुडाल्या. धक्कादायक म्हणजे तिघी बुडत असताना त्यांचा बचाव करण्याऐवजी जावेद व त्याच्या साथीदाराने नदीपात्रातून पळ काढला. लोकांनी पळून जात असताना जावेद याला पकडले.

याप्रकरणी किनवट पोलिसांनी आधी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.खंडेराव धरणे, किनवटचे डीवायएसपी रामकृष्ण मळघणे यांनी आरोपी जावेद याची कसून चौकशी केली. त्यानंतर तिघींच्या मृत्यूप्रकरणी लक्ष्मी देवीदास कांबळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मयत ममताचा पती शेख जावेद (रा.सायफळ ता.माहूर) व मिथून कुवर सदानंद कुवर या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०४, ३४ सह ३ (२), ( व्ही),(ए) अनुसूचित जाती – जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजुंनी तपास करत असून याप्रकरणी अधिक चौकशी डीवायएसपी रामकृष्ण मळघणे करीत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!