Friday, December 6, 2024

पित्याने उपसरपंच मुलाचा सुपारी देऊन खून केल्याचे उघडकीस; तमाशातील मुलीला घरी आणण्याच्या आणि निवडणुकीतील कर्जासाठी शेती विकावी लागल्याच्या कारणावरून खून

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

पित्यासह चार जणांना 30 मार्च पर्यंत पोलीस कोठडी

हदगाव (जि. नांदेड)– हदगाव तालुक्यात पित्याकडून उपसरपंच मुलाचा खून करण्यात आल्याच्या प्रकरणातील खुनाचे गूढ उकलले आहे. उपसरपंच असणारा मुलगा अविनाश भोयर हा तमाशातील मुलीला घरी आणण्याच्या तयारीत होता. तसेच त्याने घेतलेल्या कर्जासाठी शेती विकावी लागली होती या कारणावरून पित्याने मुलाचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी उपसरपंच असलेल्या मुलाचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वडिलांसह चार जणांना हदगाव न्यायालयाचे न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हदगाव तालुक्यातील वरुला येथील उपसरपंच अविनाश बंडू भोयर (वय 26) याच्या निवडणुकीच्यावेळी त्याच्या वडिलांनी कर्ज काढले होते. त्यानंतर काही शेती त्यांनी विकली होती. अविनाश भोयर याने पुन्हा 50 ते 60 लाख रुपये कर्ज करून ठेवले. तो दारूच्या आहारी गेल्याने त्याचे लग्न सुद्धा जमत नव्हते. एवढेच नाही तर तो दारूच्या नशेत येऊन घरच्या मंडळींना त्रास देत होता. तसेच तमाशातील मुलगी घरी घेऊन यायची आहे असेही सतत सांगत होता. या प्रकाराला वडिल कंटाळले होते. त्यामुळेच त्यांनी खुनाची सुपारी देऊन इतर तिघांच्या मदतीने खून केल्याची बाब पोलीस तपासात उघडकीस आली आहे.

दि. 22 मार्च रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास कोळी ते तळणी जाणाऱ्या रस्त्यावर निवळा पाटीलजवळ वडील बंडू शेषराव भोयर याने आपल्या मुलाच्या खुनाची सुपारी दिलेले राजाराम देवराव जाधव (राहणार भाटेगाव तालुका हदगाव), विठ्ठल भगवान अंभोरे (राहणार गौळ बाजार तालुका कळमनुरी) आणि विलास गोविंदराव शिंदे (राहणार बाभळी तालुका कळमनुरी) यांना बोलावून घेतले. या चौघांनी संगनमत करून उपसरपंच असलेला मुलगा अविनाश भोयर याचा गळा आवळून व जबर मारहाण करून खून केला होता. तसेच सदरचा मृतदेह घटनास्थळावरून गावात आणून त्याचा रुमाल जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.

याप्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात वडिलांसह चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चारही आरोपींना गुरुवारी अटक केली. शुक्रवारी दिनांक 25 मार्च रोजी हदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड आणि तपासीक अंमलदार फौजदार गोविंद खैरे यांनी या चारही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले. न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी या चार जणांना पाच दिवस म्हणजेच 30 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत पाठवले आहे.

या प्रकरणी सर्वप्रथम हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची बतावणी नातेवाईकांनी केली होती. मात्र शवविच्छेदन अहवालानंतर हा खून असल्याची बाब समोर आली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह सरणावर ठेवला होता. परंतु हदगाव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला होता. हा खुनच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वडिलांसह इतर तिघांना अटक करण्यात आली.

मृतदेहाची तपासणी केली असता पाठीवर व अनेक ठिकाणी वायरने मारल्याचे तसेच गळ्यावर आवळल्याचा व्रण दिसून आले आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी गोपाल रांजणकर त्याचबरोबर अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली होती. सदर मृत्यू संशयास्पद असल्याचे पोलिस प्रशासनाच्या लक्षात येताच उपजिल्हा रुग्णालय हदगांव येथे शवविच्छेदन करण्यात आले.  या तपासणीदरम्यान गळा आवळल्यामुळे व मारहाणीनंतर मृत्यू झाल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी नोंदविले होते. 

सदर प्रकरणात गुन्ह्याचा व आरोपीचा शोध घेणे असे बिकट आव्हान  पोलीस प्रशासनासमोर निर्माण झाले होते. याबाबत पोलीस अधीक्षक  प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रांजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, सपोनि पांढरे, पोउपनि गोविंद खैरे, पोउपनि फोलाणे, पोहेकाँ चिंतले, पो.ना. सातपुते, पो. काँ  वाडकर, पो. काँ पांचाळ  विशवनाथ हंबर्डे पो हे कॉ, पो हे कॉ चालक भीमराव नरवाडे, होमगार्ड गणेश गिरबीडे यांनी जलद गतीने तपास करुन या प्रकरणातील मयत उपसरपंच अविनाश बंडु भोयर (वय 26)  वरुला रा. वरुला ता. हदगांव याचा त्याच्या पित्याने इतर साथीदारांच्या मदतीने कौटुंबिक कलहातून गळा आवळून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी बंडु शेषेराव भोयर (वय 50) रा. वरुला ता. हदगांव , राजाराम देवराव जाधव (वय 58) रा. बाटेगांव ता. हदगांव, विठ्ठल भगवानराव अंभोरे (वय 28) रा. गौळबाजार ता. कळमनुरी व  विलास गोविंदराव शिंदे (वय 43) रा. बाभळी ता. कळमनुरी यांनी कौटुंबिक कलहातुन कट रचुन गळा आवळुन खून केल्याचे तसेच याबाबतचे पुरावे नष्ट केल्याचे निष्पन्न झाल्याने याबाबत सरकारतर्फे पोउपनि गोविंद खैरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिस ठाणे हदगांव येथे भादवि कलम 302, 120 (ब) (1).201, 34 भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पो.नि. गायकवाड हे करत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!