Friday, December 6, 2024

पुतळ्याचे तोंड भिंतीकडे: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या एकमेव पूर्णाकृती पुतळ्याची अवहेलना कायम

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

लातूर (शशिकांत पाटील): सध्या देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव धुमधडाक्यात साजरा होतोय. पण स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षातही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याच पुतळ्याची अवहेलना होत असल्याचे चित्र आपल्या लातूर जिल्ह्यात दिसत आहे. रेणापूर येथील गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रपित्याची अवहेलना सुरु असून याकडे स्थानिक प्रशासनासह सर्वच राजकीय पक्ष, विविध संघटनांचे मात्र अक्षम्य दुर्लक्ष असल्याचेच या निमित्ताने अधोरेखित झालंय.

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या महात्मा गांधीच्याच पूर्णाकृती पुतळ्याची लातूर जिल्ह्यातील रेणापूर इथे ही अवहेलना सुरु आहे.  रेणापूर हे तालुक्याचं ठिकाण. रेणुका देवीच्या मंदिरामुळे सर्वदूर परिचित असलेले रेणापूर हे स्वातंत्र्यसैनिकांचे गाव म्हणूनही ओळखलं जातं.  रेणापूरच्या मुख्य रस्त्यावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जिल्ह्यातील एकमेव पूर्णाकृती पुतळा हा तब्बल ५८ वर्षांपासून उभा आहे. मात्र चक्क भिंतीकडे तोंड करून! मुख्य रस्त्याच्या विरुद्ध बाजूला चक्क भिंतीकडे तोंड करून हा पुतळा गेल्या कित्येक वर्षांपासून उभा आहे. १९६४ मध्ये रेणापूरकरांनी वर्गणी गोळा करून हा पुतळा मोठ्या उत्साहात रेणुका देवीच्या मंदिराकडे तोंड करून उभारला होता. मात्र काही वर्षानंतर गांधीजींच्या या पुतळ्यापुढे असलेल्या खुल्या जागेवर अतिक्रमण करून दुकाने थाटली गेली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या पुतळ्याचा चेहरा हा अतिक्रमित भिंतीकडे तोंड! अशाच प्रकारे उभा आहे. आता त्यात कळस म्हणजे गांधीजींच्या या पुतळ्याच्या अगदी समोर अनेक जण चक्क ‘लघुशंका’ करतात तसेच कचराही आणून टाकतात. अपवाद फक्त १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, मराठवाडा मुक्तीदिन, महात्मा गांधी जयंती दिनीच! केवळ याच दिवशी परिसराची साफसफाई पूर्वीची ग्रामपंचायत आणि आता नगरपंचायत करीत असते, त्यानंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे असते. अतिक्रमण, अवैध वाहतुकीच्या या विळख्यात रेणापूर मध्ये महात्मा गांधींचा पुतळा आहे हे कदाचित अनेकांना लक्षातही येत नाही.

स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात ‘हर घर तिरंगा’ ही मोहिमही जोमाने राबविली जात असतानाही राष्ट्रपिता महात्मा गांधींचा या पूर्णाकृती पुतळ्याच्या य अशा स्थितीकडे मात्र कुणीही गांभीर्याने लक्ष देत नाही, हे दुर्दैवच म्हणावं लागेल. अमृत महोत्सवी वर्षातही राष्ट्रपिता महात्मा गांधीचा पूर्णाकृती पुतळा हा तसाच भिंतीकडे तोंड करूनच उभा आहे.

गांधींजींचा चष्मा, त्यात ‘स्वच्छ भारत’… एक कदम स्वच्छता की ओर’ हा चलनी नोटांवर दिसणाऱ्या संदेशाशी इथली स्थिती अगदी विसंगत अशी आहे. मात्र काही मोजके दिवस सोडले तर हा परिसर अत्यंत गलिच्छच असतो. पुतळा उभारला गेला तेंव्हा या ठिकाणी मोठा बगीचा होता, असे इथले नागरिक सांगतात. मात्र अतिक्रमण आणि घाणीच्या विळख्यामुळे हायवेच्या बाजूला पुतळा असूनही पाठमोरा असूनही याकडे संबंधित कुणीच लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.

रेणापूरचा तसा मोठा राजकीय वारसा ही आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनीही अनेक वर्ष रेणापूर विधानसभेचे प्रतिनिधित्व केलंय. गेल्या तीन टर्मपासून रेणापूर हा लातूर ग्रामीण मतदारसंघात जोडला गेला. तेंव्हापासून सलग तीन वेळा इथे काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी प्रतिनिधित्व केलंय. काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख हे सध्या लातूर ग्रामीणचे विधानसभेवर प्रतिनिधित्व करतात. तर रेणापूर नगर पंचायत ही भाजपच्या ताब्यात आहेत. मात्र नगर पंचायत, पंचायत समिती. जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभेवर प्रतिनिधित्व केलेल्या एकाही राजकीय पक्षाच्या नेत्याला राष्ट्रपित्याची ही अवहेलना का दिसली नाही ? गेल्या अनेक वर्षांपासून भिंतीकडे तोंड करून असलेला गांधीजींचा हा पुतळा सुस्थितीत का बरं आला नसेल ? हा मोठा प्रश्न आहे.

नेहमी छोट्या-छोट्या प्रश्नांवरून रास्ता रोको, विविध आंदोलने करणारे राजकीय पक्ष किंवा विविध संघटना या मुद्द्यावर का बरं रस्त्यावर येत नसतील ? कारण राष्ट्रपिता महात्मा गांधी हे मतं मिळवून देण्यात कमी पडतात म्हणून का? असा प्रश्न यामुळे निर्माण झालाय.

सध्या पुतळ्याचा परिसर स्वच्छ करून रंगरंगोटी केलेली असली तरी स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवाचा जोश विरला की पुन्हा एकदा राष्ट्रपित्याच्या हा पुतळा घाण, अस्वच्छता, अतिक्रमण आणि नैसर्गिक विधीच्या विळख्यात नेहमीप्रमाणे जाणार! किमान येत्या काळात तरी गांधीजींच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या पुढील अतिक्रमण हटवून मुक्तता करावी किंवा पुतळा तरी मुख्य रस्त्याच्या दिशेने करावा अशी सर्वांची अपेक्षा आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!