Saturday, July 27, 2024

पोलिसांच्या पिस्तूलातून पोलिसावरच गोळी झाडण्याचा प्रयत्न; अखेर पोलीस निरीक्षकांनी झाडली आरोपीवर गोळी, लोहा येथे गोळीबाराचा थरार

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– पोलिसांनी पकडल्यानंतर एका आरोपीने पोलिसांच्या पिस्तूलातून पोलिसावरच गोळी झाडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना लोहा येथे घडली आहे. या प्रकारानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी प्रसंगावधान राखून त्यांच्या पिस्तूलातून आरोपीच्या पायावर गोळी झाडत त्याला जखमी केले आणि लगेचच त्यास ताब्यात घेतले. ही सर्व थरारक घटना लोहा येथे घडली.

जवाहर नगर तुप्पा येथे एकावर गोळीबार केल्यानंतर तलवारीने हल्ला करून फरार असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बुधवारी दि. 4 मे रोजी रात्री गस्तीवर होते. आरोपीचा कसून शोध घेत त्याला ताब्यात घेण्यात आले, पण आरोपीने अचानक एका फौजदाराच्या कमरेचे पिस्तुल काढून फौजदारावर उगारले. त्याचक्षणी सोबत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी तात्काळ आरोपीच्या पायावर गोळी झाडून त्याला जखमी आणि अटक केली.

हा सर्व थरार नांदेड- लोहा रस्त्यावरील निसर्ग लंच होम जवळील सुनेगाव शिवारात घडला. यातील दिलीप पुंडलिक डाखोरे (वय 25) या आरोपीने काही दिवसांपूर्वी नांदेडपासून जवळच असलेल्या जवाहरनगर तुप्पा येथे  पिंटू कसबे या युवकावर अगोदर गोळीबार केला आणि त्यानंतर गोळी चुकल्यामुळे रागाच्याभरात तलवारीने हल्ला केला होता. त्यानंतर आरोपी दिलीप डाखोरे हा फरार झाला होता. हा प्रकार 30 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडला होता. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

संबंधित बातमी 👇🏻

या प्रकरणातील फरार आरोपी दिलीप डाखोरे हा सुनेगाव शिवारात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळाली. त्यांनी स्वतः पुढाकार घेत आपले सहकारी पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनवणे, कर्मचारी गुंडेराव करले, बालाजी तेलंग, देवा चव्हाण, मोतीराम पवार, तानाजी येळगे, रवी बाबर यांना सोबत घेऊन हे पथक सुनेगाव शिवारात गेले. आरोपी दिलीप डाखोरे हा निसर्ग लंच होम येथे थांबल्याची माहिती मिळाली. त्याठिकाणी पोहचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याकडे विचारणा सुरू केली होती. इतक्यात आरोपी दिलीप डाखोरेने सचिन सोनवणे यांच्या कमरेला लावलेले शासकीय पिस्तूल हिसकावून आपल्या हातात घेऊन पोलिसांवर रोखले. या धक्कादायक प्रकारानंतर प्रसंगावधान राखून पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी तात्काळ त्यांच्याकडील पिस्तूलातून आरोपीच्या डाव्या पायाच्या गुडघ्याखाली गोळी मारली आणि त्याला जखमी केले. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन उपचारानंतर लोहा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

हा सर्व थरार रात्री अकराच्या सुमारास घडला. सचिन सोनवणे यांच्या फिर्यादीवरून लोहा पोलीस ठाण्यात दिलीप डाखोरेविरुद्ध प्राणघातक हल्ला, शासकीय कामात अडथळा आणि भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक संतोष तांबे करत आहेत. या घटनेमुळे गुन्हेगारांची हिम्मत वाढत चालल्याचे दिसून येत आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!