Monday, June 17, 2024

पोलिसांनी पकडली चक्क गाढवं चोरणारी टोळी, गाढवांसह वाहन जप्त; नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथून गाढवांची चोरी करून नांदेडमार्गे तेलंगणामध्ये तस्करी करण्यासाठी जाणाऱ्या वाहनाला नांदेड ग्रामीण पोलिसांनी पाठलाग करून पकडले. यावेळी पोलिसांनी वाहनांसह चोरी करून नेण्यात येणारी 15 गाढवं केली. यातील एक गाढव मात्र मृत अवस्थेत आढळले. यावेळी या वाहनाचा चालक आणि त्याचे साथीदार मात्र अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैधरित्या गाढवांची तस्करी करुन बोलेरो पिकअप वाहनांचा वापर करुन परराज्यात घेवुन जाणाऱ्या टोळीवर कारवाई करुन आठ लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. काल मध्यरात्री दीडच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षात बिनतारी संदेशाव्दारे संदेश देवून शहरातील सर्व नाईट गस्त अधिकारी व अंमलदार यांना सतर्क करण्यात आले होते. परभणी जिल्ह्यातील पुर्णा येथून एक महिन्द्रा बोलेरो पिकअप हे संशयितरित्या भरधाव वेगाने नांदेड शहराकडे येत असून त्याचा पाठलाग पुर्णा पोलीस करत असल्याचे सांगण्यात आले. त्यावरुन पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीणचे रात्रीला इतवारा डिव्हीजन गस्तसाठी असलेले अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात व रात्रग्रस्त डयुटी अधिकारी म्हणुन असलेले फौजदार आनंद बिचेवार यांनी बिट मार्शल व डि.बी. पथकासह संशयीतरित्या येणारे महिन्द्रा बोलेरो पिकअप वाहन पकडण्यासाठी तात्काळ  नियोजन करुन दोन ठिकाणी नाकाबंदी केली. त्यात पोउपनि बिचेवार यांच्यासोबत गव्हाणकर, पवार, चालक मजहर शेख यांनी ढवळे कॉर्नर येथे व सपोनि सुरेश थोरात यांनी सपोउपनि केंद्र, हुमनाबादे यांचेसह उस्माननगर रोडवर अलर्ट राहून संशयीत वाहन हे लिंबगाव, भाग्यनगर, शिवाजीनगर, वजिराबाद, इतवारा ठाण्याच्या हद्दीतून नांदेड ग्रामीणच्या हद्दीत दाखल झाले. ते ढवळे कॉर्नर येथून भरधाव वेगात उस्माननगर रोडकडे गेल्याने ढवळे कॉर्नर वरील अधिकारी व अंमलदार यांनी त्याचा पाठलाग केला व समोरुन सपोनि सुरेश थोरात व अंमलदार यांनी महिन्द्रा बोलेरो पिकअप अडविली.

वाहन चालकाने वाहन बंद करुन त्याच्यासोबत असलेल्या इतर साथीदारांसह अंधाराचा फायदा घेवुन पळ काढला. सपोनि सुरेश थोरात, पोउपनि बिचेवार, पुर्णा ठाण्याचे सपोनि आश्रोबा घाटे यांनी पासिंग नंबर AP-39-UB-0426 या वाहनाची पाहणी केली असता वाहनात गाढवांना त्यांचे चारही पाय बांधुन एकावर एक कोंबवुन टाकलेले आढळून आले. सदरचे वाहन आणि त्यातील गाढवं जप्त करून नांदेड ग्रामीण ठाण्यात आणण्यात आले.

वाहनांतील जनावरांचा पंचनामा केला असता सदर वाहनांत एकुण 16 गाढवं कोंबुन भरलेले आढळून आले. त्याच्यातील एक गाढव मयत झाल्याचे दिसले. उर्वरित 15 गाढवांना चा-या पाण्याची व्यवस्था करुन त्यांना जिवनदान देण्यात आले आहे. महिन्द्रा बोलेरा पिकअप वाहन किंमती अंदाजे पाच लाख रुपये व 16 जनावरांची किंमत अंदाजे तीन लाख 10 हजार रुपये असा आठ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि आनंद बिचेवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महिन्द्रा बोलेरो पिकअप वाहन क्र. AP-39-UB-0426 चे चालक, मालक व त्यास मदत करणारे इतर आरोपीतांविरुध्द गु.रं.नं. 490/2022 कलम 279 भादंवि सहकलम 2 (2) (E) प्रा. कु. वागणुक अधिनियम 1960, कलम 124 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास गव्हाणकर करत आहेत.

तपासात सदरची गाढवं ही पुर्णा येथील असल्याचे निष्पन्न झाल्याने व गाढवांचे मालक हजर झाल्याने एका मयत गाढवावर अंत्यसंस्कार करुन उर्वरित 15 गाढवं त्यांच्या मालकांना परत करण्यात आले आहेत. या गाढवांवरच उदरनिर्वाह असणाऱ्या पुर्णा येथील गाढवांचे मालकांनी यावेळी नांदेड जिल्हा पोलिसांचे आभार मानले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!