ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- शहरात ऑटोंची संख्या मोठ्या प्रमाणात असून ऑटोद्वारे नागरिक, महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनी, जेष्ठ नागरिक बिनधास्तपणे प्रवास करतात. ऑटो चालक स्वतःच गुन्हेगार असल्याचा प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे.
एका ऑटोचालकाने त्याच्या ऑटोत बसलेल्या प्रवाशाला लुबाडण्याची धक्कादायक घटना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तुप्पा पाटी ते गोपाळचावडी रस्त्यावर घडली. यामुळे ऑटोमध्येही प्रवास करणाऱ्यांना आता असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. कोरोनाच्या महाभयंकर संकटामध्ये सर्वसामान्यांचा रोजगार हातचा गेल्याने त्यांच्यावर उपासमारी येऊ नये म्हणून शासनाकडून प्रादेशिक परिवहन विभागामार्फत शहरात व ग्रामीण भागात ऑटो चालविण्याचे परवाने देण्यात आले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात अनेकांनी ऑटो चालविण्यासाठी घेतले. अनेकांचा दिवसभर चालणाऱ्या ऑटोतून मिळणाऱ्या उत्पन्नावर उदरनिर्वाह चालतो. परंतु एका ऑटो चालकाने प्रवाशालाच लुबाडल्याच्या घटना मागील काळात घडल्या होत्या. आता पुन्हा तसाच प्रकार घडला आहे.
विनापरवानाही ऑटोची संख्या मोठ्या प्रमाणात असून तेही ग्रामीण आणि शहरी भागात चालतात. दि. 18 जुलै रोजी तुप्पा पाटी ते गोपाळचावडी रस्त्यावर ऑटो क्रमांक (एमएच 26एएन- 2024) मध्ये बसून अमोल गोविंदराव वगळे (वय 29) हे प्रवास करत होते. परंतु, ऑटो चालकाने ऑटो तुप्पा पाटी येथे न थांबवता गोपाळचावडी रस्त्याकडे नेला. याचवेळी पाठीमागून स्प्लेंडर कंपनीच्या (एमएच 26 वाय- 4722) एका दुचाकीवरून आलेल्या त्याच्या दोन साथीदारांनी अमोल वगळे यांना मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली. यानंतर त्यांच्या खिशातील तेरा हजार पाचशे रुपयांचा मोबाईल जबरीने लंपास केला.
याप्रकरणी अमोल वगळे यांची फिर्याद दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे यांनी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची सूत्रे फिरवत धारोजी बंडेवार, सोमनाथ चव्हाण आणि नरसिंग पवळे या तिघांना अटक केली. बुधवारी दिनांक 20 जुलै रोजी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने या तिघांनाही तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे. तपास फौजदार महेश कोरे करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻