ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत कोणीही डीजे लावू नये अशा सूचना पोलीस प्रशासनाने दिल्या होत्या. याबाबत उच्च न्यायालयाचे आदेश पाळावेत असे आदेश असताना मुदखेड येथील एका गणेश मंडळाने श्री मूर्ती विसर्जन मिरवणुकीत डीजे लावून शासन नियमावलीचे उल्लंघन केले. त्यांच्याविरुद्ध मुदखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच डीजे जप्त करून वाहनावरही कारवाई करण्यात आली आहे.
मुदखेड येथील एका श्री मिरवणुकीत काही उत्साही कार्यकर्त्यांनी शासकीय नियम धाब्यावर बसवत डीजे लावला. डीजेच्या आवाजाने शहर दणाणून गेले, मात्र न्यायालयाचे व जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशाचे उल्लंघन केले. सदर मिरवणूक डीजे वाजवत मराठा गल्ली, गुजरी महादेव मंदिर, चौमुखी गणपती कॉलेज, माता मंदिर अब्दुल कलाम आझाद शाळेजवळून मार्गाने वाजत गाजत निघाली.
याप्रकरणी पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या आदेशावरून पोलीस हवालदार किशोर पाटील यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून गणेश मंडळाचे प्रवीण बालाजी बेले, बालाजी संभाजी महाशेट्टी, आकाश विजय पेदे, गजानन पडोळ, आनंदा अशोकराव भालेराव, प्रदीप चमकुरे, संतोष गोपीनाथ बडे, संदेश बालाजी वाघमारे सर्व राहणार मुदखेड, गौतम दत्ता थोरात राहणार निवघा यांच्यासह डीजे मालक आणि मेंडका येथील डीजे चालक व इतर दहा ते पंधरा जण यांच्याविरुद्ध कलम २८८ भादवीसह १३४, १३५, १३६ मपोका तसेच प. स.अधीनियम क- १५ प्रमाणे मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अंमलदार ठाकूर करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻