Sunday, December 22, 2024

बदललेले राजकीय चित्र: दिल्लीत खा. चिखलीकर- खा. हेमंत पाटील साथ साथ; केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांची घेतली भेट, नांदेडहून मुंबई- पुणे- दिल्लीला नियमित विमानसेवा सुरू करण्याची मागणी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- राज्यातीलबदललेल्या राजकीय स्थितीनंतर दिल्लीतही हे बदल झाले आहेत. परिणामी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि खासदार हेमंत पाटील हे दिल्लीत साथ साथ दिसण्यास सुरुवात झाली आहे. या दोन्ही खासदारांनी एका शिष्टमंडळासह केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांची भेट घेऊन नांदेडहून मुंबई- पुणे- दिल्ली या शहरांसाठी नियमित विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून  विमानसेवा लवकरच सुरू करण्याचे आश्वासन केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिले असल्याची माहिती खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली आहे

नांदेड येथून नांदेड – मुंबई, नांदेड- दिल्ली आणि नांदेड पुणे ही विमानसेवा तातडीने सुरू करावी अशी मागणी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादीत्य सिंधिया यांची खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह खासदारांच्या शिष्टमंडळाने केली होती. या विमानसेवा लवकरच सुरू करण्यात येतील अशी ग्वाही केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादीत्य सिंधिया यांनी दिली आहे.

शीख धर्मीयांची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचखंड गुरुद्वारा येथे येणाऱ्या भाविक- भक्तांची संख्या ही दिवसेंदिवस वाढते आहे. शिवाय जगातील कानाकोपऱ्यातून हुजूर साहेब सचखंड दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्येही लक्षणिय वाढ झाली आहे.  नांदेड शहराचा झपाट्याने होत असलेला विकास पाहता नांदेडला राष्ट्रीय पातळीवर जोडण्यासाठी ही विमान सेवा अत्यावश्यक ठरणारी आहे. नांदेड – पुणे, नांदेड-दिल्ली आणि नांदेड-मुंबई या तिन्ही मार्गावर नवीन विमानसेवा सुरू करावी अशी मागणी नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, जहिराबादचे खासदार भीमराव पाटील, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन केली.

नांदेड शहराचा वाढता विस्तार आणि उद्योग व्यवसायाच्या नवीन वाढीसाठीही विमानसेवा अत्यावश्यक ठरणारी आहे. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नामुळे नांदेडला आणि मराठवाड्याला अनेक रेल्वे सेवांचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे मराठवाड्याची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढली आहे . मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपले सातत्याने प्रयत्न राहिले असून आता विमानसेवा अधिकाधिक दर्जेदार व्हावे आणि नांदेडकरांना मुंबई, पुणे, दिल्ली येथे तातडीने पोहोचता यावे, आपली कामे नियोजित वेळेत करता यावीत या अनुषंगाने या विमानसेवा प्राधान्याने सुरू कराव्यात यासाठी आपण प्रयत्नरत आहोत असे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले. इतकेच नाहीतर एमबीबीएस आणि आयआयटीचे नांदेड हे प्रवेशद्वार ठरत असल्याने येथे खाजगी शिकवणीसाठी मुंबई, पुणे यासह दिल्ली आणि देशातील विविध कानाकोपऱ्यातून विद्यार्थी मोठ्या संख्येने येत आहेत. त्यामुळे शैक्षणिक हब ठरत असलेल्या नांदेडला विमानसेवेने जोडणे अत्यावश्यक होत आहे. त्यामुळे नांदेड येथे तातडीने ह्या तिन्ही मार्गावरील विमानसेवा सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली.

या मागणीच्या अनुषंगाने केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विमानसेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील असा विश्वास दिला आहे. त्यामुळे लवकरच नांदेडकरांना मुंबई, पुणे आणि दिल्ली येथे विमानसेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!