Friday, July 19, 2024

बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यास गेलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या वाहनावर दगडफेक; डॉक्टरची सुटका करुन घेत जमावाने जप्त करण्यात आलेली औषधीही पळवली, भोकर तालुक्यातील प्रकार

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

भोकर (जि. नांदेड)- बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यास गेलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार भोकर तालुक्यात घडला आहे. इतकंच नव्हे तर जमावाने डॉक्टरची सुटका करुन घेत, जप्त करण्यात आलेली औषधीही पळविल्याची घटना सावरगाव मेट या गावात घडली आहे.

गोपनीय माहिती व काहींच्या तक्रारी प्राप्त झाल्यावरुन भोकर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल वाघमारे हे सावरगाव मेट ता. भोकर येथील एका बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी बुधवार दि.२८ सप्टेंबर रोजी  गेले होते. कोणतीही पदवी नसलेला एक बोगस डॉक्टर रुग्णावर उपचार करत असल्याचे निदर्शनास आल्यावरुन त्याच्या जवळील औषधी व उपचार साहित्य जप्त करुन कारवाईस्तव त्यास भोकर येथे घेऊन जात असतांना त्या बोगस डॉक्टरच्या समर्थनार्थ काही गावकऱ्यांनी तालुका आरोग्य अधिका-याचे वाहन अडविले व दगडफेक केली. तसेच जप्त करण्यात आलेली औषधी आणि साहित्यही पळविल्याचा प्रकार भोकर तालुक्यातील सावरगाव मेट येथे घडला आहे.

या गंभीर प्रकाराबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल वाघमारे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, तहसीलदार व पोलीस ठाणे भोकर येथे रितसर माहिती दिली आहे. तालुक्यातील सावरगाव मेट येथे एक बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करत असल्याची माहिती मिळाल्यावरुन दि.२८ सप्टेंबर २०२२ रोजी तालुकास्तरीय यंत्रणा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल वाघमारे हे तेथे गेले. तिथे बनियन टॉवेल परिधान केलेला हिमांशु मिश्रा विश्वास नावाचा एक व्यक्ती हा दोन रुग्णांवर उपचार करत असताना आढळला. त्या पैकी एका व्यक्तीला आय.व्हि. (सलाईन) लावण्यात आलेली आढळली. यावेळी हिमांशु मिश्रा विश्वास यांची चौकशी केली असता त्याने लेखी जबाब दिला की, मी या गावात माघील ८ वर्षापासून लोकांवर ऑलोपॅथीचा उपचार करतो. तसेच त्याच्या जवळ ऑलोपॅथी औषधी पण आढळुन आल्या. त्यांची लाईनलिस्टींग करून मेडीसीन जप्त करून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राहुल वाघमारे व यंत्रणा परत निघाले असता गावातील एका जमावाने त्यांचे चारचाकी वाहन अडविले व त्या वाहनावर दगडफेक केली.

दगडफेक केल्यामुळे डॉ. राहुल वाघमारे यांनी ते वाहन थांबविले असता जमावाने त्यांना अश्लील शिविगाळ केली व वाहनातील जप्त केलेली औषधी जबरदस्ती हिसकावून घेत पळविली. तसेच त्या बोगस डॉक्टरच्या सुटकेसाठी वाहनाखाली आम्ही जीव देऊ अशी धमकी दिली व त्या बोगस डॉक्टरलाही त्या वाहनातून पळविले. दगडफेक, शिविगाळ व धमक्या जमाव देत होता. त्यामुळे बोगस डॉक्टरविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या या पथकास जीव मुठीत धरुन रिकामे परतावे लागले. या पथकासोबत एक पोलीस जमादार ही होते. परंतू मोठ्या जमावापुढे तेही हतबल झाले होते.

या गंभीर प्रकाराबाबत वरीलप्रमाणे माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल वाघमारे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.नांदेड, तहसीलदार, तहसिल कार्यालय,भोकर, गट विकास अधिकारी, पंचायत समिती भोकर, पोलीस निरिक्षक, पोलीस ठाणे भोकर यांच्याकडे दिली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!