Saturday, July 27, 2024

भाजप प्रवेशाची चर्चा होत असतानाच अशोक चव्हाण कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या तयारीत; राहुल गांधींची पहिली सभा नांदेडमध्ये होणार

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ यात्रेला जन आंदोलनाचे स्वरूप आले पाहिजे -अशोक चव्हाण

नांदेड– एकीकडे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये जाण्याची चर्चा जोर धरत आहे. तर, दुसरीकडे स्वत: अशोक चव्हाण मात्र काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या तयारीला लागल्याचे दिसून येत आहे. याच अनुषंगाने बुधवारी अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत नांदेडमध्ये संवाद बैठक घेण्यात आली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी येथून काल बुधवारी भारत जोडो यात्रेला प्रारंभ झाला. १२ राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशातून ही यात्रा जाणार आहे. १५० दिवसांत ३५७० किमीचा प्रवास करून ती काश्मिरात पोहचणार आहे. महाराष्ट्रात दि. ७ नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यातील देगलुर येथे या यात्रेचे आगामन होणार आहे. भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी यांचा १६ दिवसांचा महाराष्ट्रात मुक्काम राहणार असून, त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ३८३ किलोमीटर पदयात्रा काढण्यात येणार आहे. दरोज २५ किलोमीटर गांधी स्वत: या पदयात्रेतून चालणार आहेत. प्रमुख नेते, पदाधिकारी यांच्यासह दररोज शंभर कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहणार आहेत. २५ किलोमीटरचा प्रवास जिथे संपेल तिथे ते मुक्काम करणार आहेत. विशेष म्हणजे १६ दिवसांच्या दौऱ्यात राहुल गांधी कुठेही हॉटेलमध्ये मुक्काम करणार नाहीत, तर तंबु टाकून त्यात मुक्काम करणार आहेत. मुक्कामात ते त्या परिसरातील शेतकरी, विविध समाज घटक, महिला बचत गट यांच्याशी संवाद साधणार आहेत.

या यात्रेच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये एक बैठक घेतली. महागाई, बेरोजगारी यासारखे सर्वसामान्यांचे प्रश्न घेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेस कन्याकुमारीपासून प्रारंभ झाला आहे. ही यात्रा नोहेंबर महिन्यांत नांदेडला येणार आहे. सामाजिक सद्भावाचा संदेश व सामान्यांच्या प्रश्नांसाठीच्या या यात्रेस जन आंदोलनाचे स्वरूप आले पाहिजे यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन अशोकराव चव्हाण यांनी या बैठकीत केले.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नोहेंबर महिन्यात नांदेडला येणार आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रशिक्षण व प्रबोधन शिबिरांच्या आयोजनासंदर्भात बुधवार दि ७ सप्टेंबर रोजी दुपारी येथील शासकीय विश्रामगृहात संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रशिक्षण व प्रबोधन समितीचे राज्य समन्वयक विनायकराव देशमुख, माजी मंत्री डी. पी . सावंत, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी आ. वसंतराव चव्हाण, महापौर जयश्री पावडे, शाम उमाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सध्या महाराष्ट्रभर सुरू आहे. एकीकडे ही चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे स्वत: अशोक चव्हाण मात्र काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेच्या आणि राहुल गांधी यांच्या 4 दिवसीय नांदेड जिल्हा यात्रा आणि सभेच्या तयारीला लागल्याचे दिसून येत आहे. दि. 7 नोव्हेंबरला नांदेड़ जिल्ह्यात राहुल गांधी यांच्या या यात्रेचे आगमन होणार असून पहिली जाहीर सभाही नांदेड येथेच होणार आहे. बुधवारी याचनिमित्ताने नांदेड येथे अशोक चव्हाण व माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत भारत जोडो अभियानाच्या तयारीच्या नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली.

या बैठकीत बोलतांना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की,महागाई, बेरोजगारी,आदी  सर्वसामान्य नागरिकांच्या  प्रश्नांकडे केंद्रातील सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी ‘भारत जोडो यात्रा’ पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. दिल्लीत झालेल्या हल्लाबोल रॅलीतही जनआक्रोश व्यक्त करण्यात आला. आता पुन्हा भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून सामान्यांचे प्रश्न प्रभावी पणे मांडण्यासाठी व जनतेमध्ये जाऊन संवाद साधण्यासाठी ही यात्रा आहे.

ही यात्रा देगलूर -नायगांव -नांदेड -अर्धापूर अशी अंदाजे ४ दिवस नांदेड जिल्ह्यात असणार आहे. यापूर्वीच्या सभा असो की रॅली नांदेडच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी नीटनेटके आयोजन करून यशस्वी केले आहे. ही यात्रा ही अशीच यशस्वी व्हावी यासाठी आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. यात्रेचे स्वागत करण्यासाठी मार्गावर त्या गावातील व लगतच्या गावातील जास्तीतजास्त नागरिक सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकात  जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी या यात्रेच्या तयारीचा आढावा मांडला. सुत्रसंचलन संतोष देवराये यांनी केले. या बैठकीस जिल्ह्यातील काँग्रेसचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी सहभागी होते. एकंदर अशोक चव्हाण या यात्रेच्या आणि राहुल गांधी यांच्या सभेच्या नियोजनात झोकून देऊन सहभागी होत असल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यता ही केवळ अफवा असल्याचेही आता यानिमित्ताने स्पष्ट होत आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!