ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

चौथ्या दिवशी पाऊण तासातच न्यूझीलंडच्या फलंदाजीचा फडशा
मुंबई – टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडवर 372 धावांनी दणदणीत विजय मिळवला असून मालिकाही जिंकली आहे. चौथ्या दिवसांचा खेळ सुरू झाल्यानंतर अवघ्या पाऊण तासातच भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजीचा फडशा पाडला. भारताच्या रविंद्रचंद्र अश्विन आणि जयंत यादव यांनी प्रत्येकी चार बळी घेत किवींचा डाव अवघ्या 167 धावांत गुंडाळला.
कानपूर येथे झालेली पहिली कसोटी नाट्यमयरीत्या अनिर्णित राहिली होती. पहिल्या कसोटीत भारताचा विजय हुकला होता. त्यामुळे मालिकेतील दुसरी कसोटी अतिशय निर्णायक होती. विजयासाठी भारताला अवघ्या 5 बळींची आवश्यकता होती. न्यूझीलंडचे फलंदाज भारताचा विजय किती लांबवतात याकडे अनेकांचे लक्ष होते. पण, भारतीय गोलंदाजांनी चाहत्यांना विजयासाठी फार वेळ प्रतिक्षा करायला लावली नाही.
भारताचा फिरकीपटू जयंत यादव हा कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. रचिन रविंद्रला १८ धावांवर बाद करत जयंत यादवने दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर जयंत यादवने न्यूझीलंडला एकाच षटकात दोन धक्के दिले. काइल जेमीसन आणि टीम साऊथी यांना त्याने भोपळा फोडण्याचीही संधी दिली नाही. एकाच षटकात दोघेही बाद झाले. त्यानंतर विल्यम सोमरव्हिलेला तंबूत माघारी धाडत किवींना 9 वा धक्का दिला. त्यानंतर आर. अश्विनने हेनरी निकोल्सला बाद करत भारताच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
टीम इंडियाने दिलेल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाची खराब सुरुवात झाली. सलामीवीर टॉम लॅथम आणि विल यंग यांना अश्विनने बाद केल्यानंतर अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर रॉस टेलर बाद झाला. मात्र, दुसरीकडे डॅरिल मिशेलने संघाचा डाव सावरला आणि त्यानं 92 चेंडूत 60 धावा केल्या. परंतु, 35 व्या षटकात अश्विनच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. त्यानंतर टॉम ब्लंडल 37 व्या षटकात धावचीत झाला. तिसऱ्या दिवसाअखेर न्यूझीलंडने पाच बळी गमावून 140 धावा केल्या होत्या. भारतीय गोलंदाजांनी सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी न्यूझीलंडचा पराभव निश्चित केला. भारतीय गोलंदाजांनी किवींचा पहिला डाव 62 धावांवर गुंडाळला होता.
वानखेडे स्टेडियमवर झालेला दुसरा कसोटी सामना हा ऐतिहासिक ठरला. न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेल याने भारताच्या पहिल्या डावात सर्व 10 गडी बाद केले. अशी कामगिरी करणारा हा जगातील तिसराच गोलंदाज ठरला. पटेलने भारताच्या दुसऱ्या डावातही 4 गडी बाद केले. वानखेडे स्टेडियमवर कसोटीत सर्वाधिक बळी मिळवण्याचा विक्रमही त्याच्या नावावर झाला.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
