ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
शंकरनगर (जि. नांदेड)– भारत जोडो यात्रेत काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी. पांडे यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा सोमवारी रात्री नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये दाखल झाली. देगलूरमधून सकाळी साडेआठ वाजता पदयात्रेला पुन्हा सुरुवात झाली होती. मात्र, अटकळी येथे यात्रा पोहोचताच अनर्थ घडला. अटकळी येथे काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्णकुमार पांडे (नागपूर) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.
महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेला आजचा दुसरा दिवस आहे. यात्रा चार दिवस नांदेड जिल्ह्यात आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांच्या सहक-यांनी यात्रेचे नियोजन केले आहे. मात्र, यात्रेचा आजचा दुसराच दिवस असताना ही घटना घडली आहे. कृष्णकुमार पांडे यांनी भारत जोडो यात्रेच्या झेंडा तुकडीचे संचालन केले. त्या दरम्यान त्यांना श्वास घेण्याचा त्रास होत होता. त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचे दु:खद निधन झाले. दुपारच्या कॅम्पमधे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, माजी मुख्यमंत्री खा. दिग्विजय सिंह, सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजी देसाई, एच के पाटील, नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, संदेश सिंगलकर, महेंद्र सिंह वोहरा आदी सर्व नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
खा. राहुल गांधी यांनीही के. सी. पांडे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर घेण्यात आलेल्या शोक सभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. काँग्रेस सेवा दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्णकुमार पांडे यांच्या कुटुंबीयांना काँग्रेस पक्षातर्फे 25 लाखांची मदत करण्यात येणार असल्याचे यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले. भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील दुस-या दिवशीची पदयात्रेची सांगता भोपाळा गाव येथील छोटेखानी सभेने झाली.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻