Sunday, October 6, 2024

भेटीगाठी: तिकडे मुख्यमंत्र्यांनी घेतली वळसे पाटील यांची भेट; तर इकडे अब्दुल सत्तार, अशोक चव्हाण यांच्या घरी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- राज्यभरातराजकीय नेत्यांच्या भेटीगाठींचे जणू सत्रच सुरू असल्याचे दिसून येत आहे. काल शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीची राज्यभर चर्चा होत असतानाच आज शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट दिली.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज त्यांच्या नांदेड दौऱ्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत काँग्रेसचे माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, काँग्रेस आमदार अमर राजूरकर, शिंदे गटाचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर, भाजप आमदार राजेश पवार, काँग्रेस आमदार मोहनराव हंबर्डे आदींची उपस्थिती होती.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट देऊन अशोक चव्हाण यांच्यासोबत तब्बल अर्धा तास चर्चा केली. या भेटीमुळे नांदेड शहरासह सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यातच अब्दुल सत्तार आणि अशोक चव्हाण यांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले असता पत्रकार परिषदेनंतर त्यांनी थेट अशोक चव्हाण यांचे शिवाजीनगर भागात असलेल्या निवासस्थान गाठले. या दोन नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. नेमकी चर्चा काय झाली याबाबत बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी, आमच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. अब्दुल सत्तार हे माझे जवळचे मित्र आहेत, मी मुख्यमंत्री असताना ते माझ्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून कार्यरत होते, असे सांगत सगळं ओक्के आहे अशी मिश्किल प्रतिक्रिया व्यक्त केली.

त्यानंतर या भेटीवर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, अशोक चव्हाण माझे नेते आहेत. मी खऱ्या अर्थाने अशोक चव्हाण यांच्यामुळेच राजकारणात सक्रिय झालो. राजकारणावर कुठलीही चर्चा आमच्या दोघांत झाली नाही, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला. मात्र सोशल माध्यमावर मागील काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपा मध्ये जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या, त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि अशोक चव्हाण यांनीही या अफवा असल्याचे सांगितल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाले होते. परंतु आज रविवार रोजी अब्दुल सत्तार यांनी अशोक चव्हाण यांच्या घरी भेट दिल्यानंतर पुन्हा राज्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, काल शनिवारी भीमाशंकर येथे दर्शनासाठी गेले असताना एकनाथ शिंदे यांनी राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मात्र ही भेट सदिच्छा भेट असून, त्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, असे दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे. वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांच्या निवासस्थानी स्वागत केले.

या भेटीबाबत माहिती देताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज माझ्या मतदारसंघात श्री भीमाशंकर क्षेत्राचे दर्शन घेण्यास आले होते. चहापानाच्या निमित्ताने त्यांनी माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. मुख्यमंत्र्यांचे आदरपूर्वक स्वागत व पाहुणचार आम्ही केला. महाराष्ट्राच्या राज्यप्रमुखांच्या औपचारिक दौऱ्यातील ही सहजभावपूर्ण अगत्यशीलता होती. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. तसे प्रयोजन असण्याचे काहीच कारण नाही, असे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

पण एकूणच राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ माजी मंत्र्यांच्या भेटीगाठी सुरू केल्याने राजकीय चर्चांना मात्र मोठे उधाण आले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!