ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

•भोकर मध्ये आज रॅलीद्वारे सुरेश राठोड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
भोकर (जि. नांदेड)- ‘वंचित’ने भोकर मतदारसंघात एका भावाची उमेदवारी बदलून दुसऱ्या भावाला संधी दिली आहे. ‘वंचित’ ने एकूणच नांदेड जिल्ह्यात तिसरा उमेदवार बदलला आहे. यापूर्वी नांदेड उत्तरमध्ये गौतम दुथडे यांच्याऐवजी प्रशांत इंगोले तर किनवटमध्ये प्रा. विजय खुपसे यांच्याऐवजी डॉ.पुंडलिक आमले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर आता भोकरमध्ये रमेश राठोड यांच्याऐवजी त्यांचे भाऊ सुरेश राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भोकरचे नवीन उमेदवार सुरेश राठोड यांनी आज रॅलीद्वारे उमेदवारी अर्ज दाखल केला.
भोकर विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीकडून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण व काँग्रेस महाविकास आघाडीच्या वतीने पप्पू पाटील कोंढेकर हे दोन तगडे उमेदवार रिंगणात आहेत. याठिकाणी वंचित बहुजन आघाडीने भोकर मतदार संघातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या व घोषित उमेदवारांच्या आग्रहावरुन आता रमेश राठोड यांची उमेदवारी बदलून त्यांचे छोटे भाऊ सुरेश राठोड यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
वंचित बहुजन आघाडीने प्रसिध्द केलेल्या यादीत रमेश राठोड यांना भोकर विधानसभा मतदारसंघातून पक्षाची उमेदवारी घोषित केली होती. परंतू घोषीत उमेदवार रमेश राठोड व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या इच्छेवरुन रमेश राठोड यांची उमेदवारी माघारी घेऊन त्यांच्याऐवजी त्यांचे छोटे भाऊ सुरेश राठोड यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे.
दरम्यान ‘वंचित’ने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या आग्रहापोटी उमेदवारीत फेरबदल केल्याने रमेश राठोड व उमेदवार सुरेश राठोड एकत्र आल्याने मोठा भाऊ छोट्या भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे अशा शब्दात रमेश राठोड यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. सुरेश राठोड हे नांदेड येथील हॉटेल व्यावसायिक असून ते माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात. प्रतापराव पाटील चिखलीकर मित्रमंडळाचे ते अध्यक्षही होते.
सुरेश राठोड यांनी रॅलीद्वारे दाखल केला उमेदवारी अर्ज
भोकर विधानसभा मतदारसंघात जाहीर करण्यात आलेले वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश टीकाराम राठोड यांनी आज मंगळवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२४ रोजी ओम लॉन्स बायपास रोड पासून ते तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढून शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
